प्राची सोनवणेनवी मुंबई : गणेशोत्सव आणि गौरीनिमित्त लिलीयम, ग्लॅडिओला, आॅर्किड आदी फुलांची उलाढाल दुप्पट झाली आहे. इतर सणांच्या तुलनेत या दहा दिवसांत फुलांचा चांगला व्यापार होतो. या सात दिवसांमध्ये फुलांनामोठ्या प्रमाणात मागणी असून,नवी मुंबई, पनवेल परिसरात ८०लाख रुपयांची उलाढाल झाल्याची तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फुलांचे भाव वाढल्याने शेतकºयांना चांगला मोबदला मिळत असल्याची माहिती फूलबाजारातील व्यापाºयांनी दिली.थायलंडवरूनही मोठ्या प्रमाणात आॅर्किडच्या फुलांची आवक झाल्याची माहिती व्यापाºयांनी दिली. ही फुले जास्त काळ टिकत असल्याने गणेशोत्सव कालावधीत मोठ्या प्रमाणात मागणी असते. गणेशोत्सव आणि गौरी आगमनामुळे फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे. केवळ गणेश मंडळेच नव्हे तर घरगुती मूर्तींच्या सजावटीसाठी देखील फुलांचामोठ्या प्रमाणात वापर केलाजात आहे. त्यामुळे सजावटीसाठी फुलांच्या मागणीत वाढझाली आहे. फुलांबरोबरच सजावटीसाठी फिलर्स म्हणून वापरल्या जाणाºया विविध प्रकारच्या पानांची आवक चांगली होत आहे. बंगळुरू, कोलकाता, नशिक, पुणे येथील बाजारांतून फुलांची तसेच पानांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.लिली, गुलछडी, गुलाब या फुलांबरोबरच आता कार्नेशन, जरबेरा, ग्लॅडिएटर, लिलीयम, ग्लॅडिओला, आॅर्किड या फुलांचीही गणेश भक्तांना ओळख झाली आहे. दोन ते तीन दिवस ही फुले टिकत असल्याने त्याला पसंती मिळत आहे. सजावटीमध्ये डेसिना, आरेका पाम, सायकस, टेबल पाम, फिश पाम, साँग आॅफ इंडिया अशा विविध प्रकारच्या पानांचा फिलर्स म्हणून वापर केल्याने सजावटीमधील सौंदर्य खुलण्यास मदत होत आहे.पूजेसाठी वापरल्या जाणाºया फुलांना अपेक्षेप्रमाणे मागणी असली तरी सजावटीच्या फुलांना ही ठरावीक कालावधीतच मागणी असते. लग्नसराई, दसरा, दिवाळी या कालावधीपेक्षा गणेशोत्सवात सजावटीच्या फुलांना मागणी असून इको फे्रंडली सजावटीकरिता या फुलांचा वापर केला जातो. नाशिकहून बटण गुलाबांची आवक केली जात असल्याची माहिती व्यापाºयांनी दिली.अतिवृष्टीमुळे फुलांचे भाव तिपटीने वाढले असून २० ते ४० रुपये किलो दराने विकली जाणारी झेंडूची फुले १२० ते १६० रुपये किलोने विकली जात आहेत. ५० ते ६० रुपये किलो दराने विकली जाणारी गुलछडी ३२० ते ३५० रुपये किलोने विकली जात आहे. वसईहून जास्वंद, तुळस आणि बेलपत्राची आवक होत असून गौरीपूजनाच्या दिवशी याला मोठ्या प्रमाणात मागणी होती. बहुतेक फुले ही गोवा, उटी, बंगळुरू, कोलकाता येथून येत असल्याची माहिती व्यापारी विकास भोपी यांनी दिली.
शहरात फुलांची उलाढाल ८० लाखांवर, नाशिक, पुण्यातून गुलाबांची आवक : अतिवृष्टीमुळे दरात तिपटीने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 1:18 AM