भरावामुळे करंजा खाडीचा प्रवाह बंद
By admin | Published: February 14, 2017 04:34 AM2017-02-14T04:34:36+5:302017-02-14T04:34:36+5:30
उरणमधील पागोटे गावच्या पाठीमागे असलेल्या एनएच४ महामार्गालगत सिडकोद्वारे चालू असलेल्या करंजा रस्त्याच्या कामामुळे
उरण : उरणमधील पागोटे गावच्या पाठीमागे असलेल्या एनएच४ महामार्गालगत सिडकोद्वारे चालू असलेल्या करंजा रस्त्याच्या कामामुळे खाडीतील पाण्याचा प्रवाह बंद झाला आहे. त्यामुळे याचठिकाणी खाडीचे रसायनमिश्रित पाणी साचत असल्याने पागोटे, नवघर, कुंडेगाव ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. खाडीचा प्रवाह पूर्णपणे सुरळीत करावा, अशी मागणी पागोटे गावातील ग्रामस्थ नीलेश नारायण पाटील यांनी उरणचे तहसीलदार उरण, रायगडचे जिल्हाधिकारी, परिक्षेत्र उप वनअधिकाऱ्यांकडे केली आहे.
पागोटे गावच्या पाठीमागे असलेल्या एनएच४ हा महामार्ग जेएनपीटीकडे जाणारा असून रस्त्यालगतच खाडी आहे. सिडकोच्या माध्यमातून नवीन करंजा रस्त्याचे काम सुरू आहे. येथील खाडीतून समुद्राच्या पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात सुरू असतो. कुंडेगाव, पागोटे, नवघर गावातील सांडपाणी तसेच आजूबाजूच्या परिसरातील कंपन्यांचे रसायनमिश्रित दुर्गंधीयुक्त पाणी या प्रवाहातूनच बाहेर पडते. मात्र सिडकोने खाडीत मातीचा भराव टाकून रस्ता तयार केला आहे. भराव टाकण्यापूर्वी सिमेंटचे पाईप टाकून खाडीतील पाण्याला वाट मोकळी करून देणे गरजेचे होते. मात्र तसे न केल्याने खाडीतील पाणी एकाच ठिकाणी तुंबले आहे. दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तुंबलेले पाणी पागोटे, नवघर, कुंडेगाव या गावात घरात येत असल्याने पावसाळ्यात धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. भरावामुळे खारफुटीही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे रस्त्यासाठी करण्यात आलेल्या भरावाचे काम थांबवून,खाडीचा प्रवाह मोकळा करावा, अशी मागणी पागोटे ग्रामस्थ निलेश नारायण पाटील यांनी केली.