नवी मुंबई - विमानतळासाठी उलवे नदीचा प्रवाह बदलण्यात आला आहे. ९६ मीटर उंचीच्या डोंगराचे सपाटीकरण करून ३.२ किलोमीटरचा चॅनेल तयार करण्यात आला आहे. शुक्रवारी या चॅनेलमधून नदीचे पाणी वळविण्यात यश आले असून, त्यामुळे विमानतळ विकासपूर्व कामाचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.उलवे नदीचा प्रवाह बदलणे हे विमानतळाच्या विकासपूर्व कामांमध्ये महत्त्वाचा टप्पा होता. विमानळ परिसरातील गावांमध्ये पावसाळ्यात उद्भवणारी पूरसदृश परिस्थिती टाळण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांसाठी नदीचा प्रवाह बदलण्याची शिफारस केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन पुणे यांनी केली होती. यासाठी गाभा क्षेत्रामधील ९६ मीटर उंचीच्या डोंगराचे सपाटीकरण करून त्याला झिरो लेव्हल करण्यात आली होती. त्या जागेतून तब्बल ३.२ किलोमीटरचा चॅनेल तयार केला होता. गुरुवारी नदीतील पाणी नवीन चॅनेलमध्ये सोडण्यासाठीची कार्यवाही पूर्ण झाली.सिडकोच्या अभियांत्रिकी विभागाने दोन डोगर फोडून नदीचा प्रवाह चॅनलमध्ये जाण्यासाठी मार्ग मोकळा केला. शुक्रवारी मुसळधार पाऊस सुरू झाला व नदीतील पाणी नवीन चॅनेलमधून वाहू लागले. प्रवाह बदलण्याचे काम यशस्वी झाल्याचे लक्षात येताच सिडको अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला.उलवे नदीच्या नवीन प्रवाहाच्या मार्गावर सिडकोचे पथक पूर्ण दिवसभर लक्ष ठेवून होते. पाण्यासाठी अडथळा होत आहे का व इतर सर्व गोष्टींची पाहणी केली जात होती. दिवसभर पाणी व्यवस्थित जात होते. सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी सांगितले की, गुरुवारी प्रवाह बदलण्यासाठीची सर्व कामे पूर्ण केली होती. शुक्रवारी नवीन चॅनेलमधून पाणी सोडण्यात आले.प्रवाह बदलण्याचे काम यशस्वी झाले असून विमानतळाच्या कामातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विमानतळ पूर्व कामामध्ये उच्चदाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करणे, उलवे टेकडीचे सपाटीकरण याचाही समावेश होता. ही दोन्ही कामे यापूर्वीच पूर्ण करण्यात आली होती.
उलवे नदीचा प्रवाह बदलण्यात आले यश, विमानतळ विकासपूर्व कामाचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 2:10 AM