दसऱ्यानिमित्त फुलल्या बाजारपेठा
By Admin | Published: October 20, 2015 11:51 PM2015-10-20T23:51:39+5:302015-10-20T23:51:39+5:30
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गेल्या दोन दिवसांपासून दुकानांमध्ये बुकिंग सुरु केली आहे. दसऱ्याचा हा
नवी मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गेल्या दोन दिवसांपासून दुकानांमध्ये बुकिंग सुरु केली आहे. दसऱ्याचा हा मुहूर्त चुकू नये यासाठी चारचाकी, दुचाकी वाहनांबरोबरच घरगुती वापरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू, नवीन घर खरेदी करण्यासाठी अॅडव्हान्स बुकिंगसाठी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. ग्राहकांचा वाढता कल पाहता शहरातील दुकाने, मॉल्स, दुचाकी व चारचाकी शोरुम्समध्येही आकर्षक आॅफर्स आणि मोठमोठ्या बक्षिसांनी ग्राहकांना भुरळ पाडण्याचा प्रयत्न केल्याचे पहायला मिळते.
मॉल, शोरूम्समध्ये मोठ्या प्रमाणात आकर्षक आॅफर्स पहायला मिळत आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीवर अमुकअमुक किमतीचा स्मार्ट फोन, घर सजावटीच्या वस्तू तसेच ३० ते ४० टक्क्यांची सूट अशा प्रकारे ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न व्यावसायिकांनी केला आहे. गेल्या आठवडाभरापासूनच चारचाकी आणि दुचाकी गाड्यांच्या बुकिंगची सुरुवात झाली. सराफांच्या दुकानांमध्येही दागिन्यांच्या बुकिंगसाठी ग्राहकांची झुंबड पहायला मिळते. दसऱ्यानिमित्त घरोघरी लावल्या जाणाऱ्या झेंडूच्या फुलांच्या तोरणामुळे बाजारात झेंडूच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. झेंडूची फुलांच्या किमती मागील वर्षीपेक्षा ३० ते ४० रुपयांनी वाढल्या आहेत. शेवंतीची फुले ३७० ते ४०० किलोने उपलब्ध असून दुष्काळामुळे उत्पन्नामध्येही घट झाल्याची माहिती विक्रेते जयप्रकाश पासवान यांनी दिली. (प्रतिनिधी)