नवी मुंबई : घणसोली-ऐरोली जोडरस्त्यावर ३७२ कोटी रुपये खर्चून उड्डाणपूल बांधण्यात येणार असून त्याच्या जोडरस्त्याची लांबी ३.४ कि.मी. असेल तर जोड उड्डाणपुलाची लांबी १.०६ कि.मी. असणार आहे. हा उड्डाणपूल ऐरोली-मुलुंड, काटईला जोडला जाणार असल्यामुळे नवी मुंबईची वाहतूक कोंडीची समस्या कायमची दूर होणार असल्याची माहिती खासदार राजन विचारे यांनी दिली. खासदार राजन विचारे यांच्या घणसोली येथील प्रस्तावित उड्डाणपुलाचा पाहणी दौरा गुरुवारी केला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, सिडको, वनविभाग, महापालिकेचे संबंधित अधिकारी, शिवसेना जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, विठ्ठल मोरे, विजय चौगुले आदी यावेळी उपस्थित होते. या जोडरस्ता उड्डाणपुलामुळे बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, मुरबाडकडे जाण्यासाठी प्रवाशांना कमी वेळेत सुरक्षित प्रवासाची सोय होणार आहे. त्याचबरोबर घणसोली, कोपरखैरणे, दिवा आणि वाशी परिसरातील प्रवाशांना या उड्डाणपुलाचा फायदा होणार आहे. गेल्या १२ वर्षांपासून रखडलेल्या या जोडरस्त्यावरील उड्डाणपूल प्रकल्पाला गती यावी यासाठी २४ डिसेंबर २०२० रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे यांच्या उपस्थितीत त्यांनी सर्वप्रथम हा प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय घेतला. आयुक्त अभिजीत बांगर यांनी पदभार स्वीकारताच हाच ८०० कोटींचा प्रकल्प आता ३७२ कोटींवर आणून सिडको आणि महापालिकेचे ४२८ कोटी रुपये वाचविले. याबद्दल विचारे यांनी आयुक्तांना धन्यवाद दिले.
१५ दिवसांनी काम सुरूठाणे-बेलापूर मार्गावरील रस्त्याला पर्याय रस्ता म्हणून ऐरोली-ठाणेकडे जाण्यासाठी वाशी-अरेंजा कॉर्नरपासून एकूण आठ ठिकाणांच्या वाहतूक सिग्नल जंक्शन ओलांडून जावे लागते. त्यामुळे वाशी सेक्टर १७ ते महात्मा फुले जंक्शन ते कोपरखैरणे अशा उड्डाणपुलाच्या कामासाठी खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नातून मंजुरी मिळाली आहे.