बेलापूर जंक्शनजवळील उड्डाणपूल झाला खुला, वाहतूककोंडीचा प्रश्न निकाली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 12:30 AM2020-12-24T00:30:53+5:302020-12-24T00:31:42+5:30
Navi Mumbai : नवी मुंबई महापालिका मुख्यालयाजवळील बेलापूर जंक्शन येथे पामबीच मार्ग, जेएनपीटी उरण रोड, सायन पनवेल महामार्ग, सीबीडीकडे जाणारा रस्ता अशा विविध रस्त्यांचा चौक आहे.
नवी मुंबई : सीबीडी बेलापूर येथील महापालिका मुख्यालयाशेजारील बेलापूर जंक्शन येथे होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. या पुलाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून, वाहतुकीसाठी उड्डाणपूल खुला करण्यात आला आहे.
नवी मुंबई महापालिका मुख्यालयाजवळील बेलापूर जंक्शन येथे पामबीच मार्ग, जेएनपीटी उरण रोड, सायन पनवेल महामार्ग, सीबीडीकडे जाणारा रस्ता अशा विविध रस्त्यांचा चौक आहे. या ठिकाणी वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असल्याने वाहतूककोंडीची मोठी समस्या निर्माण होत होती.
या मार्गावरून उरणच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित केले जात असून, भविष्यात वाहतूककोंडीची समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याने या मार्गावर बेलापूर जंक्शन येथे उड्डाणपूल विकसित केला जात आहे.
या उड्डाणपुलाचे सायन पनवेल महामार्गाकडून उरणच्या दिशेने जाणाऱ्या एका टप्प्याचे काम पूर्ण झाले असून, उरण कडून सायन-पनवेल महामार्गाकडे येणाऱ्या एका टप्प्याचे काम सुरू आहे.
एका टप्याचा वापर सुरू
सद्यस्थितीत होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी उड्डाणपुलाच्या पूर्ण झालेल्या एका टप्प्याचा वापर सुरू करण्यात आला आहे. या पुलावरून जड-अवजड वाहनांची वाहतूक सुरू झाल्याने जंक्शनवर होणारी वाहतूककोंडी काही प्रमाणात नियंत्रणात आली आहे. वाहतूककोंडीची समस्या सुटल्याने वाहनचालक समाधान व्यक्त करीत आहेत.