वाहतूककोंडीवर शहर गतिशीलता योजना, उड्डाणपुलांचे जाळे उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 04:30 AM2018-07-14T04:30:14+5:302018-07-14T04:30:23+5:30
शहरात वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी महापालिकेने शहर गतिशीलता योजनेची (शहर मोबॅलिटी प्लॅन) घोषणा केली आहे. तुर्भे नाका, नेरुळ रेल्वेस्थानक, पामबीच रोडवर ऐरोली ते घणसोली दरम्यान उड्डाणपुलासह अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा महापौर जयवंत सुतार यांनी केली आहे.
नवी मुंबई : शहरात वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी महापालिकेने शहर गतिशीलता योजनेची (शहर मोबॅलिटी प्लॅन) घोषणा केली आहे. तुर्भे नाका, नेरुळ रेल्वेस्थानक, पामबीच रोडवर ऐरोली ते घणसोली दरम्यान उड्डाणपुलासह अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा महापौर जयवंत सुतार यांनी केली आहे. ऐरोली, वाशी ते उलवे दरम्यान सागरी मार्ग बनविण्याच्या योजनेचाही यामध्ये समावेश आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात भविष्यात सुरू करण्यात येणाऱ्या प्रकल्पांची माहिती देण्यासाठी महापौर जयवंत सुतार यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा करण्यात आली. भविष्यात शहर मोबॅलीटी प्लॅनच्या अंतर्गत वाशी सेक्टर १७ ते सानपाडा वारणा चौकपर्यंत सर्व्हिस रोड बनविण्यात येणार आहे. पामबीच रस्त्यावर सर्व्हिस रस्ता बनविणे. वाशी सेक्टर १७ मधून पामबीचवरून पुण्याकडे जाण्यासाठी स्वतंत्र मार्गिका बांधण्यात येणार आहे. ऐरोली नाका येथे भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे. कोपरखैरणे विभागातील पावणे ब्रिज ते सेक्टर ११ दरम्यान नवीन पूल बांधण्यात येणार आहे. यामुळे तुर्भे एपीएमसी व सानपाड येथून कोपरखैरणे व ठाणे-बेलापूर रोडकडे जाणाºया नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. नाल्यावर ४० मीटर लांबीचा व १२ मीटर रुंदीचा पूल बांधण्यात येणार आहे. ठाणे-बेलापूर रोडवरून कोपरखैरणे-घणसोली पामबीचकडे जाण्यासाठी नवीन लिंक रोड महापेला जोडण्यात येणार आहे.
ठाणे-बेलापूर रोडवरून ऐरोली गाव, समतानगर, साईनाथवाडी, शिवकॉलनी येथे जाण्यासाठी सेक्टर ३ भारत बिजलीच्या भुयारी मार्गाचा वापर करावा लागतो. तेथील समस्या सोडविण्यासाठी ऐरोली नाका परिसरात नवीन भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे. कोपरखैरणे डी-मार्ट जवळ रस्ता ओलांडताना नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असते. वाहतूककोंडी वाढत असून, भविष्यात अपघात होण्याची शक्यता आहे. यामुळे परिसरामध्ये नवीन पादचारी पूल बांधण्यात येणार आहे. नेरुळ सेक्टर २१मधील रेल्वेस्थानकासमोरील नरेश चौकातून पादचारी भुयारी मार्ग बांधणार आहे. ऐरोली ते कटई नाका येथे एमएमआरडीए बांधत असलेला पूल ठाणे-बेलापूर रोडला जोडणार आहे. बेलापूर गावातून रेल्वेलाइन पुलाखालून आम्रमार्गाला समांतर महापालिका मुख्यालयापासून नवीन रस्ता बांधणे. बेलापूर आयकर कॉलनी ते बेलापूर स्मशानभूमी येथे रस्ता बनविणार आहे. बेलापूर विभागातील आम्रमार्ग ते सेक्टर ११, दिवाळे गाव मार्गे सायन-पनवेल महामार्गाला जोडणारा नवीन मार्ग बनविण्यात येणार आहे.
तुर्भे नाक्यावर नवीन उड्डाणपूल
पालिकेने ठाणे-बेलापूर रोडचे काँक्रीटीकरण केले आहे. एमएमआरडीएने या रोडवर दोन उड्डाणपूल व एक भुयारी मार्ग तयार केल्यानंतरही तुर्भे नाका येथे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. कोंडी सोडविण्यासाठी तुर्भे नाका येथे ६५४ मीटर लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे.
ऐरोली ते उलवे सागरी मार्ग
महानगरपालिकेला दिवा ते दिवाळे दरम्यान विस्तीर्ण खाडीकिनारा लाभला आहे. खाडीकिनाºयापासून जवळच आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू आहे. या परिसरातील वाहतूक जलद व सुरळीत व्हावी यासाठी ऐरोली ते वाशी व वाशी ते उलवे दरम्यान सागरी उन्नत मार्ग बांधण्यात येणार आहे.
नेरूळमध्ये उड्डाणपूल
रेल्वे स्टेशनच्या पूर्व व पश्चिमेला जाण्यासाठी सीवूड किंवा राजीव गांधी उड्डाणपुलाचा वापर करावा लागतो. ही समस्या सोडविण्यासाठी आयुक्त बंगला ते रेल्वे स्टेशनदरम्यान नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. यासाठी अर्थसंकल्पातही तरतूद करण्यात आली आहे.
पामबीचवर नवीन पूल
पामबीच रोडवर घणसोली ते ऐरोलीदरम्यान १.९५ किलोमीटर लांबीचा नवीन पूल बांधण्यात येणार आहे. यासाठी एमसीझेडएकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मंजुरीनंतर या पुलाचे काम सुरू केले जाणार आहे.
जुईनगर रेल्वे क्रॉसिंग ब्रीज
रेल्वे रूळांमुळे जुईनगरमध्ये जाणाºया नागरिकांना नेरूळ किंवा सानपाडामधून जावे लागत आहे. येथील नागरिकांची समस्या सोडविण्यासाठी जुईनगर येथे नवीन रेल्वे क्रॉसिंग पूल बांधण्यात येणार आहे.
तुर्भे पुलावरून नवीन मार्गिका
वाशीकडून तुर्भे पुलावरून एमआयडीसी क्षेत्रात फायझर मार्गे जायचे झाल्यास तुर्भे नाका येथे ठाणे- बेलापूर रोडला छेदून जावे लागते. ही समस्या सोडविण्यासाठी तुर्भे पुलाला फायझर कंपनीकडील रस्त्याला जोडण्यासाठी उन्नत मार्गिका बांधण्यात येणार आहे.
नवी मुंबई महापालिकेने एमआयडीसीसह सर्व प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले आहे. भविष्यात होणारी संभाव्य वाहतूककोंडी लक्षात घेवून शहर मोबॅलिटी प्लॅन तयार केला आहे. यामध्ये आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपूल, भुयारी मार्ग व सागरी मार्ग बनविण्यात येणार असून टप्प्याटप्प्याने हे प्रकल्प पूर्ण केले जातील.
- जयवंत सुतार, महापौर, नवी मुंबई