स्वाइन फ्लूू रोखण्यासाठी जनजागृतीवर भर द्या
By admin | Published: July 1, 2017 07:29 AM2017-07-01T07:29:25+5:302017-07-01T07:29:25+5:30
पावसाळ्यात उद्भवणारे कीटकजन्य आजार तसेच स्वाइन फ्लू, लेप्टो आदी साथीच्या रोगांच्या नियंत्रणाकरिता महापौर राजेंद्र देवळेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : पावसाळ्यात उद्भवणारे कीटकजन्य आजार तसेच स्वाइन फ्लू, लेप्टो आदी साथीच्या रोगांच्या नियंत्रणाकरिता महापौर राजेंद्र देवळेकर आणि अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी गुरुवारी केडीएमसीत बैठक घेतली. या वेळी साथीच्या रोगांबाबत सुरू असलेल्या कामाचा आढावा घेताना स्वाइन फ्लूबाबत वृत्तपत्रे, केबलद्वारे महापालिका क्षेत्रात प्रभावीपणे जागृती करण्याचे आदेशही या वेळी देण्यात आले.
पावसाळा सुरू होताच यंदाही तापाचे रुग्ण केडीएमसी हद्दीत आढळून येत आहेत. अंगदुखी, डोकेदुखी आणि तापाचे रुग्ण महापालिकेच्या रुक्मिणीबाई व शास्त्रीनगर रुग्णालयांसह खाजगी रुग्णालयांतही उपचार घेत आहेत. जिल्ह्यात स्वाइन फ्लूची साथ पसरली असून कल्याण-डोंबिवलीत त्याचे काही रुग्ण आहेत. या धर्तीवर बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या. या वेळी प्रभागनिहाय साथरोग कामाची माहिती घेण्यात आली. या प्रसंगी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता रोडे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर आदी अधिकारी उपस्थित होते.