लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : बसव सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजाला संघटित करण्याचे चांगले काम सुरू आहे. नवी मुंबईसारख्या महानगरामध्ये समाजातील सर्व घटकांना एकत्र येता यावे यासाठी येथे महात्मा बसवेश्वर भवन उभारण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन राज्य मंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिले आहे. वाशीतील मराठी साहित्य संस्कृती मंडळाच्या हॉलमध्ये आयोजित बसवेश्वर जयंती व लिंगायत समाज एकजूट मेळाव्यात ते बोलत होते. बसवेश्वर यांचे विचार भावी पिढीमध्ये रुजविण्यासाठी शहरामध्येही सुरू असलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. भविष्यात संघटनेचे काम अधिक चांगले व्हावे यासाठी महात्मा बसवेश्वर भवन होणे आवश्यक असून त्यासाठी शासनस्तरावर शक्य ते सर्व प्रयत्न केले जाणार असल्याचेही सांगितले. समाजातील राष्ट्रसंत डॉ. शिवाचार्य महाराज यांनी वयाची १०१ वर्षे पूर्ण केली असल्यामुळे त्यांचाही सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना महाराजांनी समाजातील सर्व लोक, संघटना यांनी एकत्र येवून काम करण्याची गरज आहे. सर्वांनी एकत्र येवून लिंगायत धर्म वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली. उद्योजक शिवशंकर लातुरे यांनी प्रतिष्ठानने समाज संघटनेचे काम अधिक वेगाने करावे. या कार्याला शक्य ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष इरप्पा कोठीवाले व इतर पदाधिकाऱ्यांनी बसव भवनसह इतर मागण्यांचे निवेदन देशमुख यांना दिले. यावेळी उद्योजक राजेंद्र बिडवे, गोरख शिखरे, शांतकुमार बिरादार, शिवशरण साखरे, कैलास कथ्थे, अनिल चिल्लरगे, सुजाता विंचुरकर, पूजा शिखरे, जी.बी. रामलिंगय्या, महेश कोठीवाले, सिद्धराम शिलवंत व इतर मान्यवर उपस्थित होते.
बसवेश्वर भवनासाठी पाठपुरावा करणार
By admin | Published: May 12, 2017 1:57 AM