खाद्यपदार्थ विक्रेत्यांमुळे शहराची सुरक्षा ‘गॅसवर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 11:29 PM2020-02-08T23:29:25+5:302020-02-08T23:29:31+5:30

आगीचा धोका । वडापाव, चायनीसविक्रेत्यांवरील कारवाईत पालिका उदासीन

Food vendors protect city on gas | खाद्यपदार्थ विक्रेत्यांमुळे शहराची सुरक्षा ‘गॅसवर’

खाद्यपदार्थ विक्रेत्यांमुळे शहराची सुरक्षा ‘गॅसवर’

Next

सूर्यकांत वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : उघड्यावर खाद्यपदार्थ विक्रेत्यांवरील कारवाईकडे पालिका अधिकारी दुर्लक्ष करताना दिसत आहेत. परिणामी, शहरातील महत्त्वाचे नाके, चौक गॅसवर असून, त्या ठिकाणी आगीचा धोका सतावत आहे. भविष्यात अशा प्रकारची दुर्घटना घडल्यास त्यामध्ये मोठी जीवितहानी होऊ शकते.
प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दिवसेंदिवस शहरातील अनधिकृत फेरीवाले वाढत चालले आहेत. त्यात शहराबाहेरून येणाऱ्यांचा सर्वाधिक समावेश आहे. काही ठिकाणी अर्थपूर्ण संबंध जोपासून आठवडे बाजारही भरवले जात आहेत. तर अनेक नोडमधील रस्ते, पदपथ पूर्णपणे फेरीवाल्यांनी बळकावले आहेत, त्यात उघड्यावरचे अन्नपदार्थ शिजवणाºया विक्रेत्यांचाही समावेश आहे. त्यांच्याकडून रहदारीच्या ठिकाणीच गॅस सिलिंडरचा वापर करून अन्नपदार्थ शिजवले जात आहेत. याकरिता घरगुती तसेच व्यावसायिक वापराचे सिलिंडर वापरले जात आहेत. अशा वेळी एखाद्या चुकीमुळे आग लागल्यास सिलिंडरचा स्फोटही होऊ शकतो, असे बहुतांश खाद्यपदार्थविक्रेते महत्त्वाचे चौक व रदहारीच्या रस्त्यांलगतच बसलेले असतात. यामुळे त्यांच्याकडील सिलिंडरचा स्फोट झाल्यास त्यामध्ये मोठी जीवितहानी होऊ शकते. अथवा खाद्यपदार्थ तळण्यासाठी वापरले जाणारे तेलही पादचारी नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकते. तर त्यांच्याकडून विकले जाणारे पदार्थ आरोग्याच्या दृष्टीनेही हानिकारक असताना पालिकेच्या आरोग्य विभागासह अतिक्रमण विभागाकडून अर्थपूर्ण दुर्लक्ष होताना दिसत आहे. बारच्या मार्गावर, मद्यविक्री केंद्राबाहेर, रेल्वेस्थानकसमोरील चौक, जास्त वर्दळ असलेले चौक याशिवाय अनेक विभाग कार्यालयाजवळही असे खाद्यपदार्थविक्रेते दिसून येत आहेत. त्यांच्याविरोधात अनेकांनी पालिका अधिकाऱ्यांकडे तक्रारीही केलेल्या आहेत. यानंतरही उघड्यावर गॅस सिलिंडरचा वापर करून खाद्यपदार्थ शिजवणाºयांवर कारवाईकडे दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेविषयी नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

नागरिकांच्या सुरक्षाप्रकरणी पोलिसांकडून मोहीम
१अखेर उघड्यावर ज्वलनशील वस्तूंचा वापर करून नागरिकांचा जीव धोक्यात घातल्याप्रकरणी पोलिसांकडून कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार मागील काही दिवसांत सीबीडी, रबाळे, एनआरआय पोलिसांकडून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
२सार्वजनिक ठिकाणी गॅस सिलिंडरचा वापर करून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण केला जात असल्याने पोलिसांकडून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
३परिमंडळ उपायुक्त पंकज डहाणे यांनी तशा प्रकारच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यांना दिल्या आहेत; परंतु पालिकेकडून मात्र अशा प्रकारची मोहीम हाती घेतली जात नसल्याची नाराजी नागरिकांकडून व्यक्त होत आहे, त्यामुळे अद्यापही अनेक ठिकाणी मध्यरात्रीपर्यंत वडापाव, भुर्जीपाव व चायनीसच्या गाड्या दिसून येत आहेत.
उघड्यावर अन्नपदार्थ शिजवणाºयांकडून नागरिकांच्या जीविताला धोका उद्भवत आहे. त्या ठिकाणी एखादी दुर्घटना घडल्यास मोठी हानी होऊ शकते, त्यामुळे पदपथांवर, सार्वजनिक ठिकाणी अन्नपदार्थ शिजवणाºया फेरीवाल्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.
- पंकज डहाणे,
पोलीस उपायुक्त

Web Title: Food vendors protect city on gas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.