ठोक मानधनावरील शिक्षक ६ महिने राबले बिनपगारी
By admin | Published: May 2, 2017 03:24 AM2017-05-02T03:24:17+5:302017-05-02T03:24:17+5:30
महापालिकेने महाराष्ट्र व कामगार दिनाचे औचित्य साधून मुख्यालयावर आकर्षक रोषणाई केली. देशातील आर्थिकदृष्ट्या सक्षम महापालिका
नवी मुंबई : महापालिकेने महाराष्ट्र व कामगार दिनाचे औचित्य साधून मुख्यालयावर आकर्षक रोषणाई केली. देशातील आर्थिकदृष्ट्या सक्षम महापालिका म्हणून लौकिक मिरविला जात असताना दुसरीकडे पालिकेच्या शाळेतील शिक्षकांना सहा महिने बिनपगारी काम करावे लागत आहे. उपासमार होऊ लागलेल्या शिक्षकांनी नुकतीच आयुक्तांची भेट घेऊन वेतन मिळावे, अशी मागणी केली आहे.
पालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी पदभार स्व्ीाकारल्यापासून सर्व घटकांचे म्हणने ऐकून कामकाज करण्यास सुरुवात केली आहे. कडक शिस्तीचे असले तरी कोणावर विनाकारण अन्याय केला जात नाही. यामुळे शिक्षण मंडळात विनावेतन काम करणाऱ्या ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यामध्ये आम्ही ठोक मानधनावरील शिक्षक सहा वर्षांपासून महापालिकेच्या शाळांमध्ये ज्ञानदानाचे काम करत आहोत. काही महिन्यांपूर्वी आमच्या पुन:नियुक्तीची शक्यता खूप कमी असल्यामुळे आम्ही नोकरी वाचविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली व न्याय मागितला; परंतु महापालिकेच्या वतीने थोड्याच दिवसांमध्ये शिक्षक समायोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. यामुळे ठोक मानधनावरील शिक्षकांना कामावर घेऊ शकत नसल्याचे सांगण्यात आले. आम्ही त्यांची अट मान्य करून उच्च न्यायालयाच्या अधिन राहून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी समायोजित शिक्षक येईपर्यंत विनावेतन काम करण्याची तयारी दर्शविली होती; पण प्रत्यक्षात महापालिकेकडे समायोजित शिक्षक आले नाहीत व यासाठी आता सहा महिन्यांचा कालावधी गेला आहे.
वेतन मिळविण्यासाठी आम्ही उच्च न्यायालयात दाद मागितली होती. उच्च न्यायालयाने वेतन देण्याचा अधिकार नवी मुंबई महापालिकेचा आहे. शिक्षणाधिकारी जो निर्णय घेतील त्यास कोणतीही हरकत नसेल, असे मत नोंदविले आहे. आयुक्तांनी निवेदन स्वीकारले असून यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उपासमार कधीपर्यंत
महापालिका शाळेमध्ये सहा वर्षे शिक्षक ठोक मानधनावर कार्यरत आहेत. सहा महिन्यांपासून विनावेतन काम करत आहेत. पगारच नसल्याने उपासमार होत असून शिक्षकांविषयी सहानुभूतीने निर्णय घेण्यात यावा व आम्हाला योग्य न्याय मिळावा.
- सिद्धराम शिलवंत