फुटबॉलप्रेमींनी स्टेडिअम भरले, दिवाळीतही उत्साह कायम, २५ आॅक्टोबरला स्पर्धेची उपांत्य फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 06:55 AM2017-10-19T06:55:00+5:302017-10-19T06:55:21+5:30
फुटबॉलचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामने नवी मुंबईत सुरू असून, मात्र जागतिक स्तरावर लोकप्रिय असलेल्या या खेळाच्या नवी मुंबईत होणा-या सामन्यांना सर्वच स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
नवी मुंबई : फुटबॉलचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामने नवी मुंबईत सुरू असून, मात्र जागतिक स्तरावर लोकप्रिय असलेल्या या खेळाच्या नवी मुंबईत होणा-या सामन्यांना सर्वच स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नेरु ळ येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअममध्ये हे सामने खेळले जात आहेत. १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक सामन्यांतील एकूण सामन्यांपैकी आठ सामने नवी मुंबईत होत आहेत. यापैकी बुधवारी झालेल्या सामन्याला फुटबॉलप्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. २५ आॅक्टोबरला या स्पर्धेची उपांत्य फेरी होणार असून, या शेवटच्या सामन्याला देखील प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल असे चित्र पाहायला मिळत आहे.
दिवाळीच्या सुट्यांमुळे बुधवारी झालेल्या सामन्यांकरिता शहरातील अनेक संस्था, महाविद्यालये, नागरिकांनी फिफाच्या सामन्यांसाठी हजेरी लावली. यामध्ये वयोवृध्दांचा देखील समावेश होता. शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्यामुळे सामने पाहण्यासाठी जवळपास ३० हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचनांनुसार नवी मुंबई महापालिकेनेही गेले सहा महिने फिफाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती, शहराचे सुशोभीकरणाचे काम केले. विविध सोयी-सुविधा आणि शहर सुशोभीकरणासाठी २० कोटींहून अधिक रु पये खर्च केले.
या निमित्ताने सायन-पनवेल महामार्ग चकाचक झाला आहे. तसेच शहरातील अंतर्गत रस्त्यांची देखील डागडुजी करण्यात आली.
वाहतूक विभागाची कारवाई
वाहतूक विभागाच्या वतीने नो पार्किंग क्षेत्रात उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई करत दंडात्मक वसुली करण्यात आली. नेरुळ एलपी परिसरात सामने सुरू होण्यापूर्वी वाहतूककोंडी झाली होती. मात्र, वाहतूक विभागाच्या वतीने प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेत अवघ्या काहीच मिनिटांमध्ये या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. प्रवेशद्वारावर पोलिसांचा कडक पहारा ठेवण्यात आला होता. याठिकाणी छेडछाडीसारखे गैरप्रकार घडणार नाही याची देखील खबरदारी घेण्यात आली होती.
सुरक्षेकरिता चाचपणी
सामन्यांकरिता स्टेडिअमच्या आत जाण्यापूर्वी सुरक्षारक्षकांद्वारे कडक तपासणी केली जात होती. टोपी, पगडीचीसुध्दा तपासणी करून आत सोडले जात होते. खाद्यपदार्थ, द्रवपदार्थ, लोखंडी वस्तू आत नेण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. १ ते ७ क्रमांकांच्या प्रवेशद्वारावर ४ हून अधिक सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. तसेच ठरावीक काळात याठिकाणी सुरक्षेविषयीच्या सूचना दिल्या जात होत्या.
तिकिटांचा खप वाढला
गेल्या आठवड्यातील सामन्यांच्या तुलनेत या सामन्याकरिता तिकिटांचा खप वाढला होता. शेवटच्या क्षणापर्यंत तिकिटांची विक्री सुरू होती. आॅनलाइन तिकीट विक्रीलाही चांगला प्रतिसाद मिळाला असून, तसेच आॅफलाइन तिकीट विक्री ही सामन्यांना सुरवात झाली असतानादेखील सुरूच होती.