कार्यालयीन कामासाठी पायपीट
By admin | Published: February 15, 2017 04:57 AM2017-02-15T04:57:01+5:302017-02-15T04:57:01+5:30
महापालिकेशी संबंधित कामासाठी सानपाडावासीयांना पायपीट करून तुर्भे विभाग कार्यालयात यावे लागते. त्यामुळे त्यांची मोठ्या
नवी मुंबई : महापालिकेशी संबंधित कामासाठी सानपाडावासीयांना पायपीट करून तुर्भे विभाग कार्यालयात यावे लागते. त्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. सानपाडावासीयांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहिले असून सानपाडावासीयांची गैरसोय टाळण्यासाठी तुर्भे विभाग कार्यालयाचा सानपाड्यात विस्तार करण्याची मागणी केली आहे.
गेल्या काही वर्षांत सानपाडा विभागाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. त्यामुळे येथील लोकसंख्याही वाढली आहे. नागरी प्रश्न निर्माण झाले आहेत. सानपाडा वसाहत महापालिकेच्या तुर्भे विभाग कार्यालयाअंतर्गत येते. त्यामुळे कोणत्याही कामासाठी येथील रहिवाशांना तुर्भे गावापर्यंत पायपीट करावी लागते. यात श्रम व वेळ वाया जात असल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत. काही दिवसांपूर्वी ‘आमदार आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत मंदा म्हात्रे यांनी सानपाडा तेथील रहिवाशांशी संवाद साधला होता. त्यावेळी रहिवाशांनी तेथील समस्यांचा पाढा वाचला होता. या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्याचे आश्वासन त्यांनी रहिवाशांना दिले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात रहिवाशांची पायपीट थांबविण्यासाठी तुर्भे विभाग कार्यालयाचा सानपाड्यात विस्तार करावा, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे. तसेच परिवहनची सेवा पूर्ववत सुरू करावी, उद्यानांचे सुशोभीकरण करावे, सानपाड्यात नागरी आरोग्य केंद्र सुरू करावे, सानपाडा रेल्वे स्थानकातील भुयारी मार्गाची दुरुस्ती करावी आदी मागण्याही त्यांनी केल्या आहेत. (प्रतिनिधी)