नवी मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणवासींची कोकणात जाण्यासाठी असणारी संभाव्य गर्दी, वाहतूक लक्षात घेऊन त्या काळात गणेशोत्सव संपेपर्यंत मुंबई- गोवा महामार्गावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या बंदीनुसार १६ टन व त्यावरील वजनांच्या वाहनांना ही या कालावधीत पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. त्यासाठी पर्यायी मार्गही निश्चित करण्यात आला आहे.
रविवार, २७ ऑगस्टपासून गोवा मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यासंबंधीचे आदेश वाहतूक शाखा उपायुक्त तिरुपती काकडे यांनी काढले आहेत. गणेशोत्सव संपेपर्यंत हे आदेश लागू असतील. या कालावधीत मुंबई - गोवा महामार्ग क्रमांक ६६ वर अवजड वाहनांना ये-जा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या बदलामध्ये दूध, पेट्रोल, डिझेल, गॅस, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सुविधांच्या वाहनांना वगळण्यात आले आहे.
गोवा मार्गाची दुरवस्था व वाहतूककोंडी यामुळे कोकणवासीयांचा प्रवास नेहमीच त्रासदायक होत असतो. त्यात अनेक वर्षांपासून सुरू असलेले गोवा महामार्गाचे काम अद्याप पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गाव गाठताना कोकणवासीयांना संयमाची परीक्षा द्यावी लागण्याची शक्यता आहे. त्यांना या समस्येतून सोडवण्यासाठी जलदगतीने गोवा मार्गाचे काम केले जात आहे. ते वेळेत पूर्ण व्हावे व गणेशोत्सव काळात कोकणाकडे धाव घेणाऱ्यांची प्रवास सुखद व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
अवजड वाहनांसाठी पर्यायी रस्ता जुन्या मुंबई - पुणे मार्गावरून पळस्पे फाटा, कोळखे गाव येथून खालापूर, पाली फाटा मार्गे इच्छित स्थळी जाता येणार आहे. पुणे - मुंबई महामार्गावरून येणारी अवजड वाहने कोन फाटा येथून खालापूर, पाली फाटामार्गे वळविली आहेत.