जबरी मोबाईलचोरी करणाऱ्याला दोन तासात अटक; वाशी रेल्वे स्थानकातील घटना
By सूर्यकांत वाघमारे | Published: November 9, 2023 05:17 PM2023-11-09T17:17:50+5:302023-11-09T17:19:48+5:30
वाशी रेल्वे स्थानकात विद्यार्थिनीचा मोबाईल हिसकावून पळालेल्या चोरट्याला रेल्वे पोलिसांनी दोन तासात अटक केली आहे.
नवी मुंबई : वाशी रेल्वे स्थानकात विद्यार्थिनीचा मोबाईल हिसकावून पळालेल्या चोरट्याला रेल्वे पोलिसांनी दोन तासात अटक केली आहे. त्याच्याकडून इतरही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. चेंबूर येथे राहणाऱ्या ममता गुप्ता (१८) या विद्यार्थिनी सोबत वाशी रेल्वे स्थानकात हि घटना घडली होती. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास ती रेल्वे स्थानकाच्या पादचारी भुयारी मार्गातून फलाटावर चालली होती. यावेळी दबा धरून बसलेल्या अज्ञात तरुणाने तिच्या हातातील मोबाईल हिसकावला होता.
याप्रकरणी रात्री उशिरा तिने वाशी रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यावरून गुन्हा दाखल होताच वरिष्ठ निरीक्षक संभाजी कटारे यांनी सहायक निरीक्षक रामेश्वरी पांढरे, उपनिरीक्षक दत्तात्रेय बदाले, सतीश पवार, मनोज भगत, कपिल देशमुख, योगेश शेजवळ व श्रीधर मैदांड यांचे पथक केले होते. त्यांनी स्थानकातील व स्थानकाबाहेरील सीसीटीव्ही मधून संशयित चोरट्याची माहिती मिळवली होती. त्याद्वारे दोन तासात सानपाडा परिसरातून अजय प्रकाश धोतरे (२३) याचा शोध घेऊन अटक केली.
अंग झडतीमध्ये त्याच्याकडे चोरीचा मोबाईल देखील आढळून आला असून तो मूळचा सांगलीचा आहे. त्याच्याकडून इतरही मोबाईल चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी वाशी रेल्वे पोलिस अधिक तपास करत आहेत.