विदेशी नागरिकास अटक
By Admin | Published: April 28, 2017 12:45 AM2017-04-28T00:45:31+5:302017-04-28T00:45:31+5:30
कोपरखैरणे परिसरात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या युगोचुकू जॉन नेयाडी (३७) या नायजेरियन नागरिकास अमली पदार्थ
नवी मुंबई : कोपरखैरणे परिसरात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या युगोचुकू जॉन नेयाडी (३७) या नायजेरियन नागरिकास अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडे एमडी रॉक व पावडर असा ३ लाख ३० हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा सापडला आहे.
नायजेरियनमधील मूळ नागरिक असलेल्या युगोचुकू नेयाडी हा ठाणे जिल्ह्यातील दिवा येथे बेकायदेशीरपणे वास्तव्य करत होता. नवी मुंबईमधील कोपरखैरणे परिसरात अमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलीस निरीक्षक माया मोरे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मोरे व उपनिरीक्षक अमित शेलार यांच्या पथकाने २७ एप्रिलला सेक्टर ११ मधील जनविकास सोसायटीच्या गेटजवळ सापळा रचला. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी आलेल्या युगोचुकू याला ताब्यात घेवून झडती घेतली असता त्याच्याकडे ८५ ग्रॅम एमडी रॉक व २५ ग्रॅम वजनाची एमडी पावडर सापडली. या पदार्थांची किंमत ३ लाख ३० हजार ५०० एवढी आहे. त्याला ताब्यात घेवून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर गोवा व इतर ठिकाणी अमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याची माहिती सहायक आयुक्त नितीन कौसाडीकर यांनी दिली.