- नामदेव मोरे, नवी मुंबई
अडवली-भुतावलीमधील ३५५ हेक्टरवरील जंगल नष्ट करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. दोन वर्षे तक्रारी करूनही महापालिका प्रशासन डेब्रिज माफियांवर कारवाई करत नाही. शेतकरी कुटुंबावर हल्ला झाल्यानंतरही गुन्हे दाखल केले जात नाहीत. डेब्रिज माफियांवर मोक्का लावण्याऐवजी त्यांच्यासमोर बेकायदेशीरपणे भराव करण्यासाठी पायघड्या टाकल्या जात असल्याने शेतकऱ्यांसह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून या प्रश्नावर आंदोलन उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नवी मुंबईला लाभलेला नैसर्गिक ठेवा संपविण्याचे षड्यंत्र सुरू झाले आहे. महापालिका प्रशासनाने दहा वर्षे अर्थसंकल्पामध्ये अडवली भुतावलीमध्ये प्रादेशिक उद्यान उभारण्यासाठी करोडो रूपयांची तरतूद करत आहे. ६४४ हेक्टर खासगी व वनविभागाच्या जमिनीवर हे उद्यान उभारण्यात येणार होते. यासाठी सर्वसाधारण सभेमध्ये ठरावही मंजूर केला होता. शहरवासी उद्यानाचे काम कधी सुरू होणार याची वाट पाहात असताना दुसरीकडे या परिसरातील जमिनी खासगी उद्योजकांनी खरेदी करण्यास सुरवात केली होती. ज्या मूळ शेतकऱ्यांनी जमिनी विकण्यास नकार दिला त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे. दबाव झुगारूनही जमिनी न विकल्यामुळे त्या जमिनीच्या चारही बाजूला डेब्रिज माफियांना हाताशी धरून भराव करण्याचे काम सुरू आहे. अडवली भुतावली परिसर मुंबई व ठाणे जिल्ह्यातील डेब्रिजचे सर्वात मोठे डंपिंग ग्राउंड झाले आहे. २०१४ पासून रोज शेकडो डंपर खाली होत आहेत. ६० ते ७० फुटांच्या टेकड्या तयार झाल्या आहेत. दिवस-रात्र डेब्रिजचा भराव सुरू असल्याबद्दल बोनकोडे गावातील आनंद नाईक, विजय नाईक व त्यांच्या परिवाराने वारंवार तक्रारी करून पालिका प्रशासनाने काहीही कारवाई केली नाही. मागील आठवड्यात नाईक परवाराला डंपरने चिरडण्याचा प्रयत्न झाला. पण पोलीस गुन्हे दाखल करत नाहीत व पालिका भराव टाकणाऱ्यांना अडवत नाही यामुळे आता न्याय कोणाकडे मागायचा, असा प्रश्न शेतकरी विचारू लागले आहेत. अडवली भुतावलीमध्ये वनविभागाच्या ताब्यात ३५५ हेक्टर जमीन आहे. बाजूला बोरीवली गावच्या हद्दीत १५८ हेक्टर जमीन वनविभागाच्या ताब्यात आहे. या जमिनीवरील जंगल हा शिक्का पुसण्याचे षड्यंत्र सुरू आहे. यासाठी वनविभागाच्या जागेवर डेब्रिज टाकून वृक्षतोड सुरू आहे. वृक्ष नाहीसे करून हे जंगल नाही असे भासविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या परिसरामध्ये तब्बल ३५० हेक्टर जमिनीवर भव्य टाऊनशीप उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. ही एमएमआरडीए परिसरातील सर्वात भव्य टाऊनशीप ठरणार आहे. मुंबई ते प्रस्तावित नवीन खाडीपुलावरून शिळ महापे मार्गे कल्याणकडे जाणाऱ्या रस्त्याचे विस्तारीकरण करून त्याचे महामार्गामध्ये रूपांतर होणार आहे. त्यासाठीची कामे सुरू आहेत. या महामार्गाला लागून ही प्रस्तावित टाऊनशीप उभारली जाणार असल्याने डेब्रिज माफियांवर कोणीही कारवाई करत नाही. ५१३ हेक्टर वनजमीन अडवली भुतावली परिसरामध्ये ३५५ हेक्टर वनजमीन आहे. त्याला लागून बोरीवली गावच्या हद्दीमध्ये १५८ हेक्टर अशी एकूण ५१३ हेक्टर वनजमीन आहे. या परिसरात गुंतवणूक करून इच्छिणाऱ्या विकासकांसाठी हे जंगल अडसर ठरत असून डेब्रिज माफियांना हाताशी धरून ते नष्ट करण्याच्या हालचाली सुरू आहेत. भराव टाकून व वृक्षतोड करून जंगल नष्ट केले जात आहे. शिवसेना उठविणार आवाज अडवली भुतावली परिसरात डेब्रिज माफियांवर कारवाई करण्यासाठी शिवसेना आवाज उठविणार आहे. विरोधी पक्ष नेते विजय चौगुले यांनी नुकतीच या परिसराला भेट देवून डेब्रिजच्या टेकड्यांविषयी नाराजी व्यक्त केली होती. हा अनागोंदी कारभार थांबविण्याचा इशारा दिला असून भराव टाकण्याचे काम सुरूच राहिले तर आंदोलन करण्याचे व सभागृहात आवाज उठविण्याचा इशारा दिला आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांवर संशय महापालिकेचे घनकचरा विभागाचे उपआयुक्त तुषार पवार यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत, पण अद्याप ठोस कारवाई केली जात नाही. डेब्रिज विरोधी पथकामधील अधिकारी मनोहर गांगुर्डे यांनी मागील आठवड्यात या परिसराची पाहणी केली होती, पण प्रत्यक्षात काहीही ठोस कारवाई केलेली नाही. यामुळे अधिकाऱ्यांच्या हेतूवर शंका येऊ लागली आहे. याविषयी प्रतिक्रिया घेण्यासाठी घनकचरा विभागाचे उपआयुक्त तुषार पवार यांच्याशी संपर्क साधला, परंतु त्यांनी फोन उचलला नाही.