ठेकेदारावर वनविभागाची कारवाई
By admin | Published: March 31, 2017 06:26 AM2017-03-31T06:26:15+5:302017-03-31T06:26:15+5:30
पेण तालुक्यातील औषधी वनसंपत्तीचा ठेकेदारांकडून चुकीच्या पद्धतीने वापर होत आहे. फक्त पेण तालुक्यातच नाही
सुनील बुरूमकर / कार्लेखिंड
पेण तालुक्यातील औषधी वनसंपत्तीचा ठेकेदारांकडून चुकीच्या पद्धतीने वापर होत आहे. फक्त पेण तालुक्यातच नाही तर संपूर्ण रायगड जिल्ह्यातील वनांमधील अवस्था हीच आहे, असे निदर्शनास येत आहे. बुधवार, २९ मार्चला यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. त्यानंतर त्याचे पडसाद वनखात्यातील कार्यालयामध्ये दिसले.
सालडोन या वृक्षापासून डिंक काढण्याचा ठेका सलाम हसन दुस्ते या ठेकेदारास दिला आहे. चुकीच्या पद्धतीने या वनौषधी वृक्षापासून डिंक काढला जात आहे. हे जेव्हा धावटा येथील ग्रामस्थांच्या लक्षात आले त्या वेळी ‘लोकमत’चे वार्ताहर आणि वृक्षमित्र यांनी वनविभाग पेण या कार्यालयात वनपाल पी. के. पाटील यांच्याकडे याबाबत विचारणा करण्यात आली. त्यानंतर वनरक्षकांबरोबर धावटा या वनविभागात धाव घेतली आणि सालडोन या वृक्षावरील डिंक कशा पद्धतीने काढला जातो याची पाहणी करण्यात आली. डिंक काढण्याचा ठेका दिला त्याला पाच महिने झाले तरी त्याची जबाबदार म्हणून वनपाल किंवा वनरक्षक यांच्याकडून तपासणी झालेली दिसत नाही. या गोष्टीस ठेकेदार आणि वनखात्यातील संबंधित कर्मचारी जबाबदारी आहेत. ठेकेदारास दिलेला कालावधीमध्ये ठरलेल्या महसुलाप्रमाणे किती किलो डिंक काढला जातोय याचे गूढ कायम आहे.
पेण वनक्षेत्र अधिकारी एस. आर. पवार यांच्याशी संपर्क साधला असता सलाम दुस्ते यास हजर करण्यात आले. नियम व अटींच्या अधीन न राहता चुकीच्या पद्धतीने डिंक काढण्यात आला आहे. हा गुन्हा त्यांनी कबूल केला आहे. या गुन्ह्याबाबत चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. परंतु वर्षातील ३१ मार्चमधील कामे असल्यामुळे पुढील कार्यवाहीची माहिती दोन दिवसांनी कळविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच उघडकीस आलेल्या गुन्ह्याबाबत चौकशी करण्यासाठी जिल्ह्याच्या वनसंरक्षक अधिकारी जयोती बॅनर्जी आणि उप वनसंरक्षक अधिकारी ढगे यांच्याशी संपर्क झाला नाही.