फ्लेमिंगोंच्या विमान अपघातातील मृत्यूची वनविभागाकडून चौकशी

By नारायण जाधव | Published: May 21, 2024 06:37 PM2024-05-21T18:37:31+5:302024-05-21T18:39:02+5:30

अपर मुख्य प्रधान वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव यांची माहिती

Forest department inquiry into plane crash death of flamingos | फ्लेमिंगोंच्या विमान अपघातातील मृत्यूची वनविभागाकडून चौकशी

फ्लेमिंगोंच्या विमान अपघातातील मृत्यूची वनविभागाकडून चौकशी

नवी मुंबई : दुबईहून मुंबईत येत असलेल्या एमिरेट्सच्या विमानाला घाटकोपर येथे सोमवारी रात्री ८.४० वाजता धडक देऊन ३९ फ्लेमिंगोचा मृत्यूप्रकरणी वनविभागाने तत्काळ चौकशी सुरू केली असल्याचे राज्याचे अपर मुख्य प्रधान वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव यांनी सांगितले. २० मे रोजी रात्री ८:४० वाजता घाटकोपर-अंधेरी लिंक रोड, लक्ष्मीनगर-पंतनगर भागात विमानाला धडकून फ्लेमिंगाे ३९ पक्षी मृत्युमुखी पडल्याची माहिती मिळताच वन विभागाच्या ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत बहादुरे, त्यांचे सहकारी तत्काळ घटनास्थळी पाेहोचून पाहणी सुरू केली. 

त्यानंतर विभागीय वन अधिकारी दीपक खाडे, मुंबई कांदळवन विभागाचे सहायक वनसंरक्षक विक्रांत खाडे हे कर्मचाऱ्यांना घेऊन अपघातस्थळाची पाहणी करून २९ मृतपक्षी ताब्यात घेतले. २१ मे रोजी सकाळी पुन्हा पाहणी केली असता आणखी १० मृत पक्षी सापडले. या सर्व मृत पक्ष्यांचे ऐरोलीतील वन विभागाच्या सागरी-किनारी जैवविविधता केंद्रात शवविच्छेदन करण्यात येत आहे.

दीपक खाडेंचे पथक करणार तपास
या संपूर्ण घटनेचा तपास विभागीय वन अधिकारी दीपक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई कांदळवन विभागाचे सहायक वनसंरक्षक विक्रांत खाडे करीत असल्याचे रामाराव यांनी स्पष्ट केले आहे. मॅन्ग्रोव्ह समिती २९ मे राेजी करणार डीपीएस तलावाची पाहणी फ्लेमिंगाेचे अधिवास क्षेत्र असलेल्या नवी मुंबईतील ३० एकरांतील डीपीएस तलाव वाचविण्यासाठी नॅट कनेक्टच्या तक्रारीवर मुंबई उच्च न्यायालयाने नियुक्त केलेली मॅन्ग्रोव्ह समिती येत्या २९ मे रोजी या तलावाची तपासणी करणार आहे, तर केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयानेही राज्य पर्यावरण विभागाला चौकशी करून अहवाल देण्यास सांगितले असल्याचे नॅट कनेक्टचे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले.

सागर शक्तीचे नंदकुमार पवार यांनी उरण तालुक्यातील बेलपाडा, भेंडखळ आणि पाणजे पाणथळीच्या जागा सिडकोने तथाकथित पायाभूत सुविधांसाठी भाड्याने दिल्याने नष्ट होत असल्याचे सांगितले. याप्रमाणेच खारघरमधील पाणथळींच्या ठिकाणी इतर पक्ष्यांच्या प्रजातींव्यतिरिक्त फ्लेमिंगोदेखील येतात, असे पक्षीप्रेमी ज्योती नाडकर्णी म्हणाल्या. या पक्ष्यांचा त्यांच्या अधिवासावर हक्क आहे, ज्यापैकी मुंबईची खाडी एक महत्त्वाचा भाग आहे, असे खारघरचे कार्यकर्ते नरेशचंद्र सिंग यांनी सांगितले.

Web Title: Forest department inquiry into plane crash death of flamingos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.