लग्नसमारंभात जुन्या प्रथांचा विसर
By admin | Published: April 5, 2016 01:30 AM2016-04-05T01:30:01+5:302016-04-05T01:30:01+5:30
सध्या पैशांचा ओघ वाढल्याने सर्वत्र हायफाय लग्न संस्कृती रु जत आहे. त्यातच जुन्या प्रथा कालबाह्य होत चालल्या आहेत. पूर्वी लग्न म्हटले की, तीन दिवस घोळ असायचा
कांता हाबळे, नेरळ
सध्या पैशांचा ओघ वाढल्याने सर्वत्र हायफाय लग्न संस्कृती रु जत आहे. त्यातच जुन्या प्रथा कालबाह्य होत चालल्या आहेत. पूर्वी लग्न म्हटले की, तीन दिवस घोळ असायचा, परंतु आता एका दिवसातच लग्न उरकण्याची पद्धत सुरू झाली आहे. यात गाणी म्हणणे, उखाणे घेणे, मुंडावळ्या बांधणे, कान पिळणे, कोपर मारणे अशा अनेक प्रथा बंद होत आहेत. एकीकडे लग्नसमारंभात पैशांचा चुराडा करत दिखाऊपणाचे स्वरूप आणले जात असताना दुसरीकडे लग्नसंस्कृतीचे वेगळेपण सांगणाऱ्या रीतिरिवाजांचा मात्र विसर पडत आहे. यामुळे जुन्या प्रथा, परंपरा बंद पडतील, अशी भीती ज्येष्ठ नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
लग्न म्हणजे दोन जीवांना व त्यांच्या कुटुंबांना एकत्र आणण्याचा सोहळा. तो साधेपणाने व जुन्या प्रथा जपत समाजासमोर आदर्श निर्माण करता येतो. आता मात्र लग्नात पैशांचा चुराडा किती, यावर लग्नाचे मोठेपण अवलंबून आहे. पूर्वी मेहंदीच्या झाडाला मोहोर लागला की तो काढून ठेवला जायचा. नवरीची दृष्ट काढताना त्याचा वापर केला जायचा. नव्या पिढीला याबाबत काहीच माहिती नाही. पूर्वी हस्तकलेने साकारलेली वाकळ देण्याची प्रथा होती, ज्याला रुखवत म्हणतात. आज हे रुखवत लग्न समारंभातून बाद होत असून बाजारातील तयार वस्तू ठेवल्या जात आहेत. गाणी बोलणे, उखाणे घेणे, मुंडावळ्या बांधणे, कान पिळणे अशा अनेक प्रथांचा विसर पडला आहे. या कार्यक्रमांमुळे उपस्थित लोकांची चांगलीच करमणूक व्हायची.
उखाणा घेणे परंपरा ही अनिवार्य होती. उखाणा घेतल्याशिवाय वधू-वराच्या भोवती जमलेले लोक हलत नसे. काही वर्षांपूर्वी वधू -वरांना बोहल्यावर चढण्याआधीच दोन-चार उखाणे तोंडपाठ करून ठेवावे लागत. काही उखाणे शब्द सौंदर्याने परिपूर्ण आशयघन असत. आता तर उखाणे ऐकायला मिळत नाहीत. त्यामुळे उखाण्यांची परंपरा अडगळीत जात आहे. हल्ली लग्न समारंभात वधू-वरास भेटवस्तू म्हणून बंद पाकिटे व निसर्गचित्राची फ्रेम दिली जातात. पूर्वी हा प्रकार नव्हता. त्याकाळी सोने-चांदी स्वस्त असल्याने जोडवी, पैंजण, अंगठी, चांदीचा पट्टा अशा भेटवस्तू देत. पूर्वी लग्न म्हणजे गावातील उत्सव असायचा व प्रत्येक नागरिक यात सहभागी होत. आजचा लग्न समारंभ हा धार्मिक विधीचे गांभीर्य जपण्यापेक्षा दिखाऊपणाला अधिक महत्त्व देणारा ठरत आहे. या सगळ्या धामधुमीत जुने रीतिरिवाज प्रत्येक घरात जपणे आवश्यक आहेत.