घणसोलीतील सेंट्रलपार्कचा प्रशासनाला पडला विसर?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 02:57 AM2020-01-21T02:57:34+5:302020-01-21T02:58:04+5:30
घणसोली येथे उभारण्यात आलेल्या सेंट्रल पार्कचे काम पूर्ण होऊन दोन वर्षांचा कालावधी होत आला, तरीही उद्यान नागरिकांच्या वापरासाठी खुले केलेले नाही.
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : घणसोली येथे उभारण्यात आलेल्या सेंट्रल पार्कचे काम पूर्ण होऊन दोन वर्षांचा कालावधी होत आला, तरीही उद्यान नागरिकांच्या वापरासाठी खुले केलेले नाही. यामुळे या सेंट्रल पार्कचा शासनाला विसर पडला का? असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.
कोट्यवधी रुपये खर्चून पालिकेने घणसोली येथे सेंट्रल पार्क विकसित केले आहे. त्याकरिता सावली गावातील काही घरे हटविण्यात आली होती. यामुळे सुरुवातीपासूनच हे पार्क वादात सापडले होते. त्यानंतर, प्रत्यक्षात पार्कच्या कामाला सुरुवात झाल्यानंतरही अनेक कारणांनी अडथळे निर्माण झाले होते. अनेक अडथळ्यांनंतर दोन वर्षांपूर्वी पार्कचे काम पूर्ण होऊनदेखील त्याचे उद्घाटन करण्यात आलेले नाही. यामुळे पार्कमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. येथील तरणतलावाची नियमित देखभालही प्रशासनाला डोईजड झाली आहे. हा नोड सिडकोकडून पालिकेकडे हस्तांतरित झाल्यानंतर, घणसोलीकरांच्या सेंट्रल पार्ककडे नजरा लागल्या होत्या.
लहान मुलांच्या खेळण्यासह, ज्येष्ठांचा विरंगुळा, तरणतला, स्केटिंग आदी सुविधा त्यामध्ये पुरविण्यात आल्या आहेत. यामुळे लवकरात लवकर हे उद्यान नागरिकांच्या वापरासाठी खुले करावे, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे. त्यानुसार, काही राजकीय व्यक्तींनी प्रशासनाने पार्क खुले न केल्यास, आपण ते खुले करू, अशा प्रकारच्या पोकळ घोषणा करून स्थानिकांच्या भावनांचा राजकीय वापर करण्याचाही प्रयत्न केला, परंतु प्रत्यक्षात वापरायोग्य स्थितीत असलेले उद्यान नागरिकांसाठी खुले करण्याचे धाडस कोणीच केले नाही. परिणामी, प्रशासनालादेखील उद्घाटनाचा विसर पडला असावा, असा संशय नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
पार्कमध्ये तरणतलावासह, स्केटिंग, फुटबॉल टर्फ मैदान यासह लहान मुलांच्या विरंगुळ्याची साधने पुरविण्यात आली आहेत. त्यामुळे या पार्कच्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्यांची त्या ठिकाणी गर्दी होत आहे, परंतु प्रशासन व सत्ताधारी यांच्या उदासीनतेमुळे लहान मुलांसह नागरिकांना कुंपणाबाहेरूनच पार्कमधील सुविधांचे दर्शन घ्यावे लागत आहे. या संदर्भात महापौर जयवंत सुतार व पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.
सेंट्रल पार्क वापरासाठी खुले होत नसल्याने लहान मुलांची गैरसोय होते. तर कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले उद्यान धूळखात आहे. प्रशासनाने हे पार्क खुले करावे.
- प्रकाश पाटील,
रहिवाशी