शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 11:38 PM2020-01-08T23:38:11+5:302020-01-08T23:38:20+5:30
खासगी शाळांच्या धर्तीवर महापालिका शाळेतही विविध सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या नवी मुंबई महापालिका प्रशासनाला पालिका शाळांमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेविषयी विसर पडला आहे.
योगेश पिंगळे
नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील खासगी शाळांच्या धर्तीवर महापालिका शाळेतही विविध सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या नवी मुंबई महापालिका प्रशासनाला पालिका शाळांमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेविषयी विसर पडला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याच्या प्रस्तावाला महासभेची मंजुरी मिळून एक वर्षाचा काळ लोटला तरी सदर काम अद्याप निविदा प्रक्रि येत अडकले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शहरातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण घेता यावे, यासाठी विविध अत्याधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नवी मुंबई महापालिकेने विविध उपक्र म राबविले आहेत. शहरामध्ये मराठी, हिंदी, उर्दू, सेमी इंग्रजी, इंग्रजी विभागाच्या शाळा सुरू करण्यात आल्या असून, शहरात सीबीएसई बोर्डाच्या दोन शाळाही सुरू केल्या आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना आवड असतानाही दहावीनंतर शिक्षण घेता येत नसल्याने कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्तावही नुकताच महासभेत मंजूर झाला आहे.
महापालिकेच्या माध्यमातून कोट्यवधी रु पये खर्च करून शाळांच्या प्रशस्त इमारती उभ्या केल्या असून, विद्यार्थ्यांना सुविधा देण्याच्या अनुषंगाने शालेय साहित्य, गणवेश, पूरक पोषण आहार आदी सुविधाही देण्यात येतात. नवी मुंबई पालिका शिक्षण मंडळांतर्गत पालिका ५५ प्राथमिक शाळा आणि माध्यमिक विभागाच्या १८ शाळा अशा एकूण ७३ शाळा चालवते.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही बसविले असून, महापालिका प्रशासनानेही यासाठी पुढाकार घेतला होता. पालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी बाजारभाव मागवले होते. त्यानुसार सर्व शाळांमध्ये एकूण ४१२ डोम कॅमेरे, १९५ फिक्स कॅमेरे असे एकूण ६८७ सीसीटीव्ही बसवणे आणि पाच वर्षांसाठी त्यांची देखभाल, दुरुस्ती यासाठी पाच कोटी २४ हजार ९०१ इतक्या खर्चाच्या प्रस्तावाला २० आॅक्टोबर २०१८ रोजी झालेल्या महासभेत मान्यताही मिळाली आहे. या कामासाठी तीन वेळा निविदा प्रक्रि याही राबविण्यात आल्या असून, चार कंत्राटदारांनी या प्रक्रि येत सहभाग घेतला होता; परंतु तांत्रिकदृष्ट्या अपात्र झाले आहेत. निविदा प्रक्रि येत अडकलेल्या या प्रस्तावामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
>मैदानांमध्ये वाहने पार्किंग
शहरात वाहने पार्किंगसाठी जागांची कमतरता असल्याने वाहने पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्याच्या दुतर्फा व्हॅन पार्किंग केली जात असताना, आता महापालिका शाळा असलेल्या मैदानातही बेकायदेशीरपणे वाहने पार्किंग केली जात आहेत. यामधील अनेक वाहने एकाच जागेवर उभी राहत असल्याने विद्यार्थ्यांना खेळताना अडचण निर्माण होत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
>सुरक्षारक्षकांची कमतरता
महापालिकेने शाळांच्या प्रशस्त इमारती बांधल्या असल्या तरी या इमारतींना पुरेसे सुरक्षारक्षक नाहीत, त्यामुळे शाळेमध्ये ये-जा करणाºया बाहेरील नागरिकांच्या नोंदी होत नसून यामुळेही सुरक्षा धोक्यात आली आहे.
>महापालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याच्या निविदा शिक्षण विभागाच्या माध्यमातून मागविण्यात आल्या होत्या; परंतु त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी होत्या. त्या दूर करण्यात आल्या असून आता अभियांत्रिकी विभागाच्या माध्यमातून निविदा मागविण्यात येत आहेत. लवकरच महापालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात येतील.
- सुरेंद्र पाटील,
शहर अभियंता,
नवी मुंबई महानगरपालिका