नवी मुंबईमध्ये आरोग्य सर्वेक्षणासाठी ७२० पथकांची निर्मिती; दहा दिवसांमध्ये पाच लाख घरांना भेट देण्याचे उद्दिष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 12:46 AM2020-09-16T00:46:22+5:302020-09-16T00:46:46+5:30
कोरोनामुक्त महाराष्ट्र करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविले जात आहे. नवी मुंबईमध्ये अभियान यशस्वी करण्यासाठी आयुक्त अभिजीत बांगर यांनी जास्तीत पथके तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
नवी मुंबई : महानगरपालिकेने शहरात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियान राबविण्यासाठी ७२० पथकांची निर्मिती केली आहे. प्रत्येक पथक प्रतिदिन किमान ५० घरांना भेटी देऊन सर्वेक्षण करणार असून, दहा दिवसांमध्ये ५ लाखांपेक्षा जास्त घरांना भेटी देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
कोरोनामुक्त महाराष्ट्र करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविले जात आहे. नवी मुंबईमध्ये अभियान यशस्वी करण्यासाठी आयुक्त अभिजीत बांगर यांनी जास्तीत पथके तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्येक पथकामध्ये दोन ते तीन कर्मचारी व स्वयंसेवकांचा समावेश असणार आहे. हे पथक घरोघरी जाऊन प्रत्येकाचे आॅक्सिजन सॅच्युरेशन व तापमान मोजले जाणार आहे. एखाद्या व्यक्तीला ताप, खोकला, घशात खवखवणे, थकवा, श्वास घेण्यास त्रास होत आहे का, हे तपासले जाणार आहे. मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, किडनीचे आजार, अवयव प्रत्यारोपण, दम अशा सहव्याधी असणाऱ्या नागरिकांची माहिती संकलित केली जाणार आहे.
नवी मुंबईत १५ सप्टेंबर ते १० आॅक्टोबरदरम्यान पहिला टप्पा व १४ ते २४ आॅक्टोबरदरम्यान दुसरा टप्पा राबविण्यात येणार आहे. सर्वेक्षणात एखाद्या व्यक्तीस ताप असेल व त्याचे तापमान १००.४ डिग्री फॅरेनाईट, तसेच आॅक्सिजन सॅच्युरेशन ९५ टक्के कमी असल्यास त्या व्यक्तीस नजीकच्या क्लिनिकला पाठविण्यात येणार आहे. या अभियानास नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
सोसायटींमध्ये घ्यावयाची काळजी
- सोसायटीमधील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक विनाकारण घराबाहेर जाणार नाहीत, याची
काळजी घ्यावी.
- सोसायटीमध्ये दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फूट अंतर राखून संवाद साधावा.
- सोसायटीमध्ये बाहेरील व्यक्तीला थेट प्रवेश देऊ नये.
- बाहेरून येणाºया व्यक्तीचे तापमान, आॅक्सिजन तपासणी करूनच आतमध्ये प्रवेश द्यावा.
खरेदीसाठी जाताना
- दुकाने, मंडई, मॉल्समध्ये खरेदीसाठी जाताना घरातील एकाच व्यक्तीने जावे.
- खरेदीसाठी गेल्यानंतर तेथे प्रदर्शनार्थ
ठेवलेल्या वस्तूंना शक्यतो स्पर्श
करणे टाळावे.
कार्यालयामध्ये घ्यावयाची काळजी
- शक्यतो वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्यावे.
- कामावर जाण्यासाठी दुचाकीने जावे किंवा पायी चालत जावे.
- बैठकांसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग पद्धतीचा
अवलंब करावा.