शिवसेनेचे माजी नगरसेवक एम.के. मढवी यांच्यावर तडिपारीची कारवाई
By नारायण जाधव | Published: October 8, 2022 05:36 PM2022-10-08T17:36:59+5:302022-10-08T17:38:00+5:30
शिवसेनेचे माजी नगरसेवक एम.के. मढवी यांच्यावर तडिपारीची कारवाई करण्यात आली आहे.
नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांनी शिवसेनेचे माजी नगरसेवक एम. के. मढवी यांना शुक्रवारपासून मुंबई शहर, ठाणे जिल्हा, रायगड आणि मुंबई उपनगर या चार जिल्ह्यातून पुढील दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. या दोन वर्षांत त्यांना चारही जिल्ह्यात येण्या-जाण्यास बंदी घातली आहे. मढवी यांच्यावर १८ गुन्ह्यांची नोंद आहे. यामध्ये मारहाण, जीवे मारण्याची धमकी आणि आर्थिक फसवणूक, सणांच्या संवेदनशील काळात दंगल घडवणे, खुनाचा प्रयत्न करणे, खून करणे, खंडणीसाठी धमकावणे , सार्वजनिक ठिकाणी मानवी जिवितास धोका पोहचवणे अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळेच पोलिसांनी त्यांच्यावर तडीपारीची कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, गेल्याच आठवड्यात मढवी यांनी पोलीस उपायुक्त विवेक पानसरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. शिंदे गटात सहभागी होत नसल्याने आपला एन्काऊंटर करू अशा धमक्या पोलीस देत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. परंतु, आरोप केल्यानंतर काही दिवसांतच त्यांना तडीपार केले आहे. या संदर्भात मढवी यांना त्यांची बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिली असून १५ सप्टेंबर रोजी त्यांचा जबाबही घेतल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंकडून उल्लेख
शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात भाषण करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात मढवी यांचा उल्लेख केला होता. एकनाथ शिंदे गटाकडून शिवसैनिकांना कशा प्रकारे त्रास दिला जातोय हे सांगताना ठाकरे यांनी मढवी यांचे उदाहरण दिले होते.
एन्काऊंटरची धमकी दिल्याचा आरोप
एकनाथ शिंदे गटात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून दबाव टाकला जात आहे. यासाठी पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्याकडून एन्काऊंटर करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप मढवी यांनी केला होता. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी नगरसेवक विजय चौगुले यांचा हात असल्याचा आरोप मढवींनी केला होता. एवढेच नाही तर पोलीस उपायुक्तांची बदली न झाल्यास आम्ही सहकुटुंब आत्महत्या करू, असा इशाराही दिला होता.