Breaking : माजी आमदार विवेक पाटलांना 'ईडी'कडून अटक, राहत्या घरातूनच घेतलं ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 10:29 PM2021-06-15T22:29:49+5:302021-06-15T22:31:32+5:30
कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह ७६ जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. कर्नाळा बँकेचे कोट्यवधी रुपयांचे घोटाळा प्रकरण राज्यभर गाजला होता
मुंबई - शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि माजी आमदार विवेक पाटील यांना ईडी म्हणजे अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली आहे. कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणीच ही अटक करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. या अटकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रात्री 9 वाजताच्या सुमारास राहत्या घरातूनच त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मुंबई ईडी झोन-२ चे सहाय्यक संचालक सुनील कुमार यांनी अटक केली. कर्नाळा बँक घोटाळ्यात आमदार विवेक पाटील हे मुख्य आरोपी असुन अनेक दिवसांपासून पाटील यांची अटकेची शक्यता वर्तविण्यात येत होती.
कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह ७६ जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. कर्नाळा बँकेचे कोट्यवधी रुपयांचे घोटाळा प्रकरण राज्यभर गाजला होता. या बँकेचे लाखो ठेवीदार ठेवी परत मिळाव्यात यासाठी प्रयत्न करीत होते. १०० कोटींपेक्षा अधिकचा घोटाळा असल्याने ईडीने यामध्ये हस्तक्षेप करत तपास सुरू केला होता. त्यात, चौकशी सुरू असताना आज विवेक पाटील यांना अटक करण्यात आली आहे.
महाविकास आघाडी सरकार विवेक पाटील यांना कारवाई पासुन वाचवत असल्याचा आरोप करण्यात येत होता.आमदार प्रशांत ठाकुर यांच्यासह आमदार महेश बालदी हे विवेक पाटील यांच्यावर कारवाईसाठी प्रयत्नशील होते. दोन्ही आमदारांनी ठेवीदारांना घेऊन मोर्चे देखील काढले होते.विवेक पाटील यांना अटक करण्यासंदर्भात मुंबई ईडी झोन 2 चे सहाय्यक संचालक सुनील कुमार यांनी अटक वॊरंटी काढला होता. या वॉरंटमध्ये मनी लॉन्डरिंगचा ठपका देखील ठेवला असुन मंगळवारी पनवेल येथील राहत्या घरातुन पाटील यांना अटक करण्यात आली.
५१२ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बँकेच्या नियमांचे उल्लंघन करून कागदपत्रांमध्ये फेरफार करून बनावट कागदपत्रे तयार केली. त्याचा कर्ज प्रकरणात वापर करून बँकेचे सभासद, ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवींचा ५१२ कोटी ५४ लाख ५३ हजार २८६ रुपयांचा अपहार केला. त्यामुळे बँकेची आर्थिक स्थिती डबघाईस आली. म्हणून सहकारी संस्था अलिबाग येथील जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-१ चे उमेश गोपीनाथ तुपे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार ७६ जणांविरोधात १७ फेब्रुवारी रोजी रात्री पनवेल शहर पोलीस ठाण्यात फेब्रुवारी २०२० मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.