बेलापूर येथील किल्ल्याची दुरवस्था; सिडकोची उदासीनता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 11:01 PM2019-03-10T23:01:38+5:302019-03-10T23:02:25+5:30
टेहळणी बुरु जाची पडझड, इतिहासप्रेमींकडून नाराजी
- योगेश पिंगळे
नवी मुंबई : बेलापूर येथील ऐतिहासिक किल्ल्याची आणि बुरुजाची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून, अनेक ऐतिहासिक घडामोडी पाहिलेला किल्ला परिसरात झालेल्या विकासकामांमुळे धोकादायक स्थितीमध्ये उभा आहे. सिडकोच्या उदासीनतेमुळे किल्ल्याबरोबर टेहळणी बुरुजाचीही मोठ्या प्रमाणावर पडझड झाली असून, किल्ल्याचे उरलेले मोजके अवशेष नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
पनवेल आणि ठाण्याच्या खाडीचा संगम होणाऱ्या ठिकाणी बेलापूर गाव वसलेले आहे. आगरी, कोळी समाजाची वस्ती असलेल्या या गावात पोर्तुगिजांनी बेलापूर किल्ला बांधला होता. वसईनंतर साष्टी बेट पोर्तुगिजांच्या ताब्यात आल्यावर खाडीतून होणाऱ्या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी व खाडी पलीकडील मराठ्यांकडून होणाºया संभाव्य हल्ल्यापासून संरक्षण मिळण्यासाठी पोर्तुगिजांनी सदर किल्ला बांधला होता. खाडीकिनारी असलेल्या भागात भराव टाकण्यात आल्याने तसेच किल्ल्याची देखभाल आणि दुरु स्तीकडे दुर्लक्ष केल्याने पडझड झाली आहे, त्यामुळे किल्ल्याचे काहीच अवशेष शिल्लक राहिले असून, किल्ल्याच्या एकमेव शिल्लक असलेल्या बुरु जाचीही मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. शहर वसविणाºया सिडकोला या किल्ल्याची डागडुजी करण्याकडे विसर पडला आहे. २०१५ साली सिडकोमार्फत भरविण्यात आले होते, या वेळी सिडकोचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांनी पुरातत्त्व विभागाच्या समन्वयाने ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी बेलापूर किल्ल्याचे सुशोभीकरण केले जाणार असल्याची घोषणा केली होती. यासाठी ११ कोटी रु पयांची भरघोस तरतूद केली होती, यामध्ये २०१७ सालापर्यंत सुशोभीकरण पूर्ण करण्यात येणार होते; परंतु सिडकोच्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने अद्याप सुशोभीकरणासाठी ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. किल्ल्यावरील सर्व बांधकामे नष्ट झाली आहेत. फक्त एक टेहळणी बुरूज अर्धवट मोडकळलेल्या अवस्थेमध्ये आहे. बुरुजाला एका बाजूला भेग पडली आहे आणि दुसºया बाजूचे बांधकाम धोकादायक स्थितीमध्ये असल्याने या ठिकाणी जाणाºया नागरिकांचा अपघात होण्याची शक्यता आहे. ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी किल्ल्याबरोबर या बुरुजाचेही रक्षण करण्याची आवश्यकता आहे. सिडकोने काढलेल्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने सिडकोने पुन्हा फेरनिविदा काढली आहे. त्यामुळे लवकरच कामाला सुरुवात होईल, असे सिडकोने स्पष्ट केले आहे.
बेलापूर किल्ल्याला पाच बुरूज व तटबंदी होती. गडाचा बालेकिल्ला ७५ फूट उंचीवर होता. गडावर २० तोफा होत्या. ३१ मार्च १७३५ रोजी नारायण जोशी यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला व २२ एप्रिल १७३७ रोजी हा गड मराठ्यांच्या ताब्यात आला.