नवी मुंबई : करावे येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी एनआरआय पोलिसांनी एकूण चौघांना अटक केली आहे. त्यामध्ये जागा मालकासह बांधकाम व्यावसायिकांचा समावेश आहे.करावे गाव येथे बांधकाम सुरु असलेल्या इमारतीची तिसऱ्या मजल्यावरील भिंत कोसळल्याची घटना मंगळवारी घडली होती. सकाळी सहाच्या सुमारास घडलेल्या या घटनेत महेंद्र खंदारे (३०) यांचा व त्यांची दोन वर्षांची मुलगी परी ऊर्फ समृध्दी हिचा मृत्यू झाला होता. तर त्यांची पत्नी रंजना (२६) व मुलगा संघरत्न (७) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर नेरुळच्या डी. वाय.पाटील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या दोघांचीही प्रकृती सुधारत असल्याचे डॉ. श्याम मोरे यांनी सांगितले. या दुर्घटनेप्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. शिताबाई दळवी (५०) यांच्या जमिनीवर विनापरवाना इमारतीचे काम सुरु होते. यावेळी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर भिंतीसाठी रचलेले सिमेंटचे ब्लॉक लगतच्या चाळीवर पडल्याने हा अपघात झाला होता. शहरात यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी दळवी यांच्यासह बांधकाम व्यावसायिक पंकज शिकदर (४२), अनुप भोईर (२५) व श्यामसुंदर तांडेल (२६) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या चौघांना अटक केली आहे. (प्रतिनिधी)
करावे प्रकरणात चौघांना अटक
By admin | Published: July 31, 2015 11:17 PM