गोठीवलीत विजेचा धक्का लागून चार मुले जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 04:59 AM2019-11-13T04:59:07+5:302019-11-13T04:59:11+5:30
उच्चदाबाच्या विद्युतवाहिनीचा शॉक लागून एका लहान मुलासह तीन मुली जखमी झाल्या.
नवी मुंबई : उच्चदाबाच्या विद्युतवाहिनीचा शॉक लागून एका लहान मुलासह तीन मुली जखमी झाल्या. घणसोलीजवळील गोठीवली येथील सेक्टर २३ मध्ये ही दुर्घटना घडली. जखमी झालेल्या चार मुलांना उपचारासाठी ऐरोली येथील बर्न सेंटर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
हेमांग चंद्रकांत (८), परी बिपीन सिंग (७), सोमन्या पाटील (८) व तनिशा चव्हाण (८), अशी या दुर्घटनेत जखमी झालेल्या लहान मुलांची नावे आहेत. ही मुले आपल्या कुटुंबीयांसह गोठीवलीतील माउली हाइट्स या १५ मजली इमारतीत राहतात. या इमारतीच्या अगदी जवळून महावितरणची उच्चदाबाची विद्युतवाहिनी गेली आहे. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी सोसायटीतील रहिवाशांकडून मागील वर्षभरापासून महावितरणकडे पाठपुरावा सुरू आहे. मंगळवारी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास या इमारतीच्या एका मजल्यावर ही मुले खेळत होती. त्या वेळी शेजारून जाणाऱ्या उच्चदाबाच्या विद्युतवाहिन्यांना या मुलांचा स्पर्श झाला.
विजेचा जोरदार झटका बसल्याने एका मुलीसह तीन लहान मुले गंभीर जखमी झाली आहेत. भाजल्यामुळे लहान मुलांचे चेहरे जळाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या दुर्घटनेमुळे या सोसायटीतील रहिवाशांनी संताप व्यक्त केला असून, बुधवारी या प्रकरणी महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे रहिवाशांनी सांगितले.