नवी मुंबई : नेरूळ सेक्टर ६ येथील उद्यानामध्ये खेळण्यांची दुरवस्था झाली आहे. घसरगुंडीजवळ असलेल्या दगडांमुळे गत आठवड्यात चार मुले जखमी झाली आहेत. याविषयी तक्रार करूनही पालिका प्रशासन लक्ष देत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सारसोळे गाव व सेक्टर ६ मधील नागरिकांसाठी दत्तगुरू सोसायटीसमोर एकच उद्यान आहे. उन्हाळ्याच्या सुट्या पडल्याने येथे मुलांची गर्दी असते. परंतु पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उद्यानाची दुरवस्था झाली आहे. येथील झोपाळे तुटले आहेत. मुलांसाठी फक्त एक घसरगुंडीच शिल्लक आहे. परंतु या ठिकाणी जागोजागी दगड विखुरले आहेत. घसरगुंडीवरून खाली येणाऱ्या मुलांच्या पायाला दगडामुळे दुखापत होत आहे. गेल्या आठवड्यात चार मुले जखमी झाली. उद्यानामध्ये हिरवळही शिल्लक नाही. वारंवार मुले जखमी होत असल्याने रहिवासी व नागरिकांनी मुले खेळत असलेल्या ठिकाणी दगडविरहित माती, गवत व वंडर्स पार्कप्रमाणे प्लास्टीकसदृश आवरण टाकावे, अशी मागणी केली आहे. नेरूळ विभाग कार्यालयातील उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांकडेही याविषयी तक्रार केली आहे. पुन्हा एखादा मुलगा जखमी झाला तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)
उद्यानात खेळताना चार मुले जखमी
By admin | Published: May 06, 2016 12:29 AM