घणसोली परिसरात कामे करताना रस्ता व पदपथामध्ये चार फुटांचे अंतर; डांबरीकरणात हलगर्जी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 02:14 AM2020-12-03T02:14:30+5:302020-12-03T02:14:34+5:30
ठेकेदारांच्या कामचुकारपणामुळे धोका
नवी मुंबई : रस्त्यांच्या डांबरीकरणात ठेकेदारांकडून हलगर्जीपणा होत असल्याचे दिसून येत आहे. पदपथापर्यंत डांबरीकरण न करता, तीन ते चार फुटांचे अंतर रिकामे सोडण्यात येत आहे. यामुळे असमानता निर्माण होऊन अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
शहरात सध्या महापालिकेमार्फत विविध विकासकामांचा धडाका सुरू आहे. त्यात रस्ते व पदपथ दुरुस्तीच्या कामांचाही समावेश आहे, परंतु रस्त्यांच्या डांबरीकरणात ठेकेदारांकडून हलगर्जीपणा होत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसते आहे. अनेक ठिकाणी सुस्थितीतील रस्त्यांचेही डांबरीकारण सुरू असल्याने ठेकेदारांना पोसण्यासाठी कामे दिली जात आहेत का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे, तर कामात हलगर्जी होत असतानाही अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष कामाची पाहणी होत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
रस्त्यांचे डांबरीकरण केले जात असताना पदपथालगतचा सुमारे तीन ते चार फुटांचा रस्ता रिकामा सोडल्याचा प्रकार घणसोलीसह अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. कोणतेही ठोस कारण नसताना रस्त्यालगतच्या भागात डांबरीकरण अर्धवट सोडले आहे. यामुळे रस्ता आणि पदपथ यामध्ये तीन ते चार फुटांचे अंतर पडले आहे. परिणामी, मागून येणाऱ्या जड अवजड वाहनाला मार्ग देण्यासाठी एखादी दुचाकी रस्त्याच्या कडेला गेल्यास अपघात होऊ शकतो. डांबरीकरणामुळे दोन ते तीन इंचाने रस्त्याची उंची वाढली आहे. पदपथ लगतचा भाग रिकामा सोडल्याने फट निर्माण झाली आहे. शिवाय त्या ठिकाणी सांडपाणीही साचू शकते. यामुळे ठेकेदारांच्या हलगर्जीबाबत नाराजी व्यक्त होत आहे.