रेवस-रेड्डी महामार्गात ऑलिव्ह रिडले कासवांची चार उत्पत्ती स्थाने होणार बाधित

By नारायण जाधव | Published: August 7, 2023 05:29 PM2023-08-07T17:29:49+5:302023-08-07T17:30:16+5:30

रत्नागिरी जिल्ह्यातील बाणकोट ते जयगड बंदरापर्यंतच्या ११५ किलोमीटरपर्यंतच्या कामाचा पॅकेज दोनमध्ये समावेश आहे.

Four habitats of olive ridley turtles will be affected along the Revas-Reddy highway | रेवस-रेड्डी महामार्गात ऑलिव्ह रिडले कासवांची चार उत्पत्ती स्थाने होणार बाधित

रेवस-रेड्डी महामार्गात ऑलिव्ह रिडले कासवांची चार उत्पत्ती स्थाने होणार बाधित

googlenewsNext

नवी मुंबई : राज्य सरकारडून सध्या सुरू असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम गेल्या एक दशकाहून अधिक काळ रखडलेले असतानाच आता रस्ते विकास महामंडळाने मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी प्रस्तावित केलेल्या रेवस ते रेड्डी या नव्या सागरी महामार्गाच्या पॅकेज दोनच्या कामात जगप्रसिद्ध ऑलिव्ह रिडले कासवांच्या चार उत्पत्ती स्थानांसह चार हेक्टर खारफुटी बाधित होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील बाणकोट ते जयगड बंदरापर्यंतच्या ११५ किलोमीटरपर्यंतच्या कामाचा पॅकेज दोनमध्ये समावेश आहे.

कॅलिफोर्निया सागरी महामार्गाच्या धर्तीवर कोकणाच्या विकासासाठी रायगड जिल्ह्यातील रेवस ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डीपर्यंत या सागरी महामार्गाच्या अंतिम आखणीस सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्यावर्षी मार्च महिन्यात मान्यता दिली होती. ४९८ किमीच्या या महामार्गाच्या बांधकामासाठी १० हजार कोटींहून अधिक खर्च प्रस्तावित असून, चार पॅकेजमध्ये सात टप्प्यांत बांधण्यात येणार आहे. यानुसार काही ठिकाणी तो चौपदरी तर काही ठिकाणी दुपदरी असणार आहे. यामुळे कोकण आणि गोवा एका नव्या मार्गाने जोडले जाणार आहे.

२२ अटींसह सीआरझेडची मंजुरी

या महामार्गाच्या पॅकेज दोनमधील बाणकोट ते जयगड या रत्नागिरी जिल्ह्यातील कामांचा प्रस्ताव सीआरझेड प्राधिकरणाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मंजुरीसाठी आला होता. त्यात या महामार्गांच्या कामात जगप्रसिद्ध ऑलिव्ह रिडले कासवांच्या चार उत्पत्ती स्थानांसह चार हेक्टर खारफुटी बाधित होणार आहे. मात्र, खारफुटीची एकूण किती झाडे बाधित होणार हे या प्रस्तावात नमूद केलेले नाही. तर ऑलिव्ह रिडलेच्या चारपैकी तीन उत्पत्ती स्थाने महामार्गापासून ५० मीटरहून अधिक अंतरावर असल्याने त्यांना धोका नसल्याचा दावा रस्ते विकास महामंडळाने केला आहे. यामुळे या कामास २२ अटींंसह मंजुरी देताना पर्यावरणीय दृष्टीची संवेदनशीलता बघून सीआरझेडने हा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी परिवेश समितीकडे पाठविला आहे.

ही आहेत ती ऑलिव्ह रिडलेची चार उत्पत्ती स्थाने

रेवस ते रेड्डी या नव्या सागरी महामार्गाच्या बाणकोट ते जयगड बंदरापर्यंतच्या ११५ किलोमीटरपर्यंतच्या कामात १० किमीच्या परिघात केळशी ५० मीटर, वेळास १३० मीटर, अंजर्ले २१० मीटर अंतरावर आहे. हे अंतरावर तसे लांब असल्याने कासवांच्या उत्पत्तीत धोका नसल्याचा दावा रस्ते विकास मंडळाने केला आहे. तर दाभोळचे उत्पत्ती स्थळ पूर्णत: बाधित होत आहे. यामुळे मँग्रोव्ह सेलने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे नसल्याचे निरीक्षण सीआरझेडने नोंदविले आहे.
असे सीआरझेड क्षेत्र होतेय बाधित
खारफुटीचे क्षेत्र - ४.०९ हेक्टर
५० मीटर बफर झोन - १.१७ हेक्टर
कासव उत्पत्ती स्थळ - ०.३७ हेक्टर
भरती रेषेच्या आतील क्षेत्र - ६.४५ हेक्टर
५०० मीटरच्या आतील क्षेत्र -३३.२५ हेक्टर
नाविकास क्षेत्र - ५२.६४ हेक्टर
सीआरझेड ४ ब क्षेत्र - ७.०२ हेक्टर

Web Title: Four habitats of olive ridley turtles will be affected along the Revas-Reddy highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.