नवी मुंबई : जुईनगर येथील बडोदा बँकेतील दरोड्यानंतर लॉकरची जबाबदारी बँकेची नसल्याचे बँकेच्या अधिकाºयांकडून सांगण्यात आले होते.त्यामुळे ग्राहकांमधून संताप व्यक्त होत होता. याप्रकरणी खासदार राजन विचारे यांनी शुक्रवारी बँक अधिकाºयांना धारेवर धरत चार तास ठिय्या मांडला. त्यानंतर गुन्हेगारांनी लुटलेल्या ३०ही लॉकरमधील चोरीला गेलेल्या ऐवजाची जबाबदारी बँकेने स्वीकारली आहे.जुईनगर येथील बडोदा बँकेचे लॉकर तोडून दरोडेखोरांनी सुमारे तीन कोटी रुपये किमतीचा ऐवज लुटला आहे. थेट लॉकर रूममध्ये भुयार खोदून गुन्हेगारांनी ही बँक लुटली आहे. या घटनेमुळे बहुतांश लॉकरधारकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. अनेकांनी मुला-मुलीच्या लग्नासाठी बनवलेले दागिने, निवृत्तिवेतनातून बनवलेला ऐवज याशिवाय काहींनी रोख रक्कम देखील बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेली होती; परंतु लॉकरची जबाबदारी बँकेची नसल्याचे सांगून बँकेने हात वर केले होते.नैसर्गिक आपत्ती वगळता गुन्ह्यात लॉकरमधून ऐवज चोरीला गेल्यास बँकेने जबाबदारी स्वीकारावी, असे ग्राहकांचे म्हणणे होते. मात्र, बँकेकडून त्यांना योग्य प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर खासदार राजन विचारे यांनी शुक्रवारी बँकेला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. या वेळी एक दिवस अगोदर कल्पना देऊनही बँकेतर्फे एकही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी बँकेविरोधात घोषणाबाजी करत बँकेबाहेर ठिय्या मांडला, तसेच बँकेच्या मॅनेजर सीमा कुमारी यांना प्रश्नांची योग्य उत्तरे देता न आल्यामुळे नेरुळ शाखेचे मॅनेजर खजान हे त्या ठिकाणी आले असता, त्यांनाही जमावाने घेराव घालत तीन तास धारेवर धरले. याप्रसंगी शहर प्रमुख विजय माने, महिला संघटक रंजना शिंत्रे, गटनेते द्वारकानाथ भोईर, नगरसेविका ॠ चा पाटील, दीपाली संकपाळ, माजी विरोधी पक्षनेते दिलीप घोडेकर, रतन मांडवे, विभाग प्रमुख मिलिंद सूर्याराव, महेश कोठीवले आदी उपस्थित होते.बँकेचे विभागीय उपव्यवस्थापक रवि शंकर हे त्या ठिकाणी आले असता, त्यांच्याकडे जमावाने धाव घेतली. तीन तास खासदार विचारे बँकेत बसून राहतात. मात्र, बँक अधिकारी वेळेवर येत नाहीत याचाही जाब विचारला. रवि शंकर त्यांच्यासोबत चर्चेदरम्यान खासदार विचारे यांनीही बँकेच्या बेजबाबदारपणाचा संताप व्यक्त केला. तसेच ज्या लॉकरधारकांचा ऐवज चोरीला गेला आहे, त्यांची जबाबदारी बँकेने घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. यावर निर्णय घेण्यास शंकर यांनी सुमारे दोन तास घेतल्यामुळे संतप्त नागरिकांनी दालनात घुसून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी जमावावर नियंत्रण मिळवले. त्यानंतर वरिष्ठांसोबत फोनवर संपर्क साधल्यानंतर रवि शंकर यांनी खासदार विचारे यांना लिखित आश्वासन देण्याचे मान्य केले. त्यानुसार बँकेने ३0ही लॉकरधारकांच्या लॉकरमधील चोरीला गेलेल्या ऐवजाची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे बँक लुटीत लॉकरमधील ऐवज चोरीला गेलेल्या बँक ग्राहकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.
बडोदा बँकेसमोर सेनेचे चार तास आंदोलन, बडोदा बँकेने स्वीकारली लॉकरची जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 1:50 AM