कळंबोली : कळंबोली येथील टाटा स्टील यार्ड हे आय के मरिन व गेट वे अॅन रेल्वे या कंपनीला भाडेतत्त्वावर दिले आहे. येथे काम करणाऱ्या जवळपास ४०० कामगारांचा दोन महिन्यांचा पगार रखडला आहे. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. थकलेला पगार मिळावा, यासाठी कामगारांनी उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत कामाचा मोबदला मिळत नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे कामगारांनी या वेळी सांगितले.
लोह-पोलाद मार्केटच्या बाजूला टाटा स्टील कंपनीने २८ एकरावर यार्ड तयार केले आहे. सिडकोकडून लिजवर जागा घेऊन कंपनीने येथे स्टील यार्ड तयार केले. यार्डात जमशेदपूरचा माल यायचा त्यानंतर तो देशभरात विविध ठिकाणी पाठवला जायचा. त्यामुळे येथील कामगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला होता. २००१ पासून टाटा कंपनीकडून येथे स्टील येणे बंद झाले. तेव्हा ही जागा आय के मरिन व गेट वे अॅन रेल्वे या कंपनीला भाडेतत्त्वावर देण्यात आली. त्या वेळी कंपनीकडून जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देऊ असे सांगण्यात आले.
मात्र, सद्यस्थितीत दोन महिन्यांपासून पगार दिला नसल्याने जुनी टोळी नं. १/४२ ते ५१ ग्रुपकडून काम बंद आंदोलन केले आहे. जून उजाडला तरी पगार न मिळाल्याने मुलांचे शाळेतील प्रवेश तसेच घरातील अडचणींमुळे जगावे कसे, असा प्रश्न शंकर जगताप या कामगाराने उपस्थित केला आहे. पगार मिळेपर्यंत काम बंद आंदोलन चालूच ठेवणार असल्याचे दत्ता शिंदे यांनी सांगितले.
महागाई भत्ता रखडलास्टील यार्ड येथील कामगारांचा ऑक्टोबर २०१६ पासून महागाई भत्तासुद्धा दिला नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. घाम गाळून डीए तर मिळालाच नाही; पण पगारही दोन-दोन महिने रखडत असल्याने उपासमारीची वेळ आल्याचे कामगार सांगतात.कळंबोली येथील स्टील यार्डातील कामगारांचे पगार रखडले ही वस्तुस्थिती आहे. दोन दिवसांत त्यांचा पगार दिला जाईल. यापुढे वेळेवर पगार होईल यांची आम्ही दखल घेऊ.- प्रमोद खामकर, प्रभारी कार्मिक अधिकारी