तुर्भे रेल्वेस्थानकासमोर चार किलो गांजा जप्त, एका आरोपीस अटक, अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 06:54 AM2017-09-16T06:54:40+5:302017-09-16T06:54:49+5:30
अमली पदार्थ विरोधी पथकाने तुर्भे रेल्वस्थानकासमोर कारवाई करून, ४ किलो १०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. तोफिक वली पटेल (४१) या आरोपीला अटक केली.
नवी मुंबई : अमली पदार्थ विरोधी पथकाने तुर्भे रेल्वस्थानकासमोर कारवाई करून, ४ किलो १०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. तोफिक वली पटेल (४१) या आरोपीला अटक केली.
अमली पदार्थमुक्त नवी मुंबई करण्यासाठी अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वतीने विशेष मोहीम राबविली जात आहे. तुर्भे रेल्वेस्थानक व एनएमएमटी डेपोच्या समोरील बाजूला एक व्यक्ती गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक राणी काळे यांना मिळाली होती. याविषयी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी गुन्हे शाखेचे उपआयुक्त तुषार दोशी, नितीन कौसडीकर यांना माहिती दिली. १३ सप्टेंबरला रात्री १२ ते १ वा. सुमारास रेल्वेस्थानकात सापळा रचण्यात आला होता. एक व्यक्ती संशयास्पदरीत्या उभी असल्याचे निदर्शनास आले. माहितीदाराने केलेल्या वर्णनाप्रमाणेच ती व्यक्ती असल्याचे लक्षात येताच, त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडे दोन खाकी गठ्ठे सापडले. गठ्ठ्यांमध्ये पाने, फुले, बिया व काड्या संलग्न असलेला उग्र वास येत असलेला गांजा आढळून आला. ४ किलो १०० ग्रॅम वजनाच्या या गांजाची बाजारभावाप्रमाणे किंमत ४८ हजार १३० रुपये आहे.
एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ (क) २० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेला आरोपी तोफिक वली पटेल हा मूळ उस्मानाबादमधील बेंबळेगाव येथे राहणारा आहे. या ठिकाणी तुर्भेनाका हनुमाननगर येथे वास्तव्य करत होता. आरोपीला अटक करण्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक राणी काळे, अजिम गोळे, संजय चौधरी, सलीम इनामदार, इकबाल शेख, संतोष गायकवाड, कासम पिरजादे, रमेश उटगीकर, सचिन भालेराव, राजेश गाढवे, अमोल कर्डिले, अमोल गागरे, सुप्रिया ठाकूर, आकाश मुके, बाबासाहेब सांगोळकर यांनी सहभाग घेतला.
तुर्भे रेल्वेस्टेशन परिसरात धाड टाकून, ४ किलो १०० ग्रॅम गांजा हस्तगत केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
- विनोद चव्हाण
वरिष्ठ पोलीस निरीक्षक