नवी मुंबई :
कोकण रेल्वेचे शंभर टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने सर्व गाड्या विजेवर चालविण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यापूर्वी काही गाड्या विजेवर धावत आहेत. आता यात आणखी चार गाड्यांची भर पडणार आहे. या गाड्या आता डिझेलऐवजी विद्युत इंजिनवर धावणार आहेत.
एर्नाकुलम – ओखा – एर्नाकुलम एक्स्प्रेस ही गाडी एर्नाकुलम ते अहमदाबाद स्थानकांदरम्यान २० जानेवारीपासून विजेवर चालविली जात आहे. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक १६३३३/१६३३४ ही तिरुवनंतपुरम सेन्ट्रल एक्स्प्रेस- वेरावल - तिरुवनंतपुरम सेन्ट्रल एक्स्प्रेस तिरुवनंतपुरम ते अहमदाबाद स्थानकांदरम्यान २३ जानेवारीपासून विजेवर धावणार आहे. गाडी क्रमांक १६३३६/१६३३५ ही नागरकोइल - गांधीधाम - नागरकोइल साप्ताहिक एक्स्प्रेस २४ जानेवारीपासून नागरकोइल ते अहमदाबाद स्थानकादरम्यान विद्युत इंजिनवर धावणार आहे. तर गाडी क्रमांक २२६५५/२२६५६ ही एर्नाकुलम - हजरत निजामुद्दीन - एर्नाकुलम सुपरफास्ट एक्स्प्रेस २५ जानेवारीपासून संपूर्ण मार्गावर विद्युत इंजिनवर चालविण्यात येणार आहेत.
रेल्वेचे १५० कोटी वाचणारकोकण रेल्वे मार्गावरील सर्वच गाड्या विद्युत इंजिनवर धावू लागल्यानंतर डिझेलवर होणाऱ्या वार्षिक १५० कोटींच्या खर्चाची बचत होणार असल्याचे कोकण रेल्वेचे म्हणणे आहे.