किरकोळ वादातून चौघांवर हल्ला, एकाचा मृत्यू : नऊ महिन्यांपूर्वीच्या भांडणाच्या रागातून केले कृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 02:46 AM2017-09-07T02:46:36+5:302017-09-07T02:47:02+5:30
किरकोळ वादातून एकाने चौघांवर प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी ऐरोली येथे घडला. या प्रकारात एकाचा मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी आहेत.
नवी मुंबई : किरकोळ वादातून एकाने चौघांवर प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी ऐरोली येथे घडला. या प्रकारात एकाचा मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी आहेत. सदर घटनेनंतर पोलिसांनी मारेकºयाला अटक केली असून त्याने जुन्या वादातून त्यांच्यावर हल्ला केल्याचे समोर आले आहे.
धनंजय भोईर असे पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून तो रोजवूड सोसायटीत राहणारा आहे. त्याच सोसायटीत राहणाºया कुटुंबातील चौघांवर त्याने दुकानात घुसून कोयत्याने वार केले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. सोहन चौधरी, अर्जुन चौधरी व मोहन चौधरी अशी जखमींची नावे आहेत. तर जलाराम भोईर असे मयताचे नाव असून तो सोहन चौधरी यांच्या दुकानात काम करायचा. सोहन यांचे मेडिकल व जनरल स्टोअर असून मंगळवारी दुपारी चौघेही त्याठिकाणी होते. यावेळी दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास त्याठिकाणी आलेल्या धनंजय भोईर याने सोबत आणलेल्या कोयत्याने सोहन यांच्यावर वार करायला सुरवात केली. यावेळी इतर तिघांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने त्यांच्यावरही वार केले. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. घटनेची माहिती मिळताच रबाळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. याप्रकरणी धनंजय भोईर याला अटक केली असून, हल्ला करताना दुखापत झाल्याने त्यालाही रुग्णालयात दाखल केले असल्याचे सहायक आयुक्त प्रदीप जाधव यांनी सांगितले.
सोहन चौधरी व धनंजय भोईर हे दोघेही ऐरोलीतील रोजवूड सोसायटीत राहणारे आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांच्यात किरकोळ वाद झाला होता. धनंजय हा सोहन यांच्या लहान मुलाला खेळवण्यासाठी घरी घेवून जात असे.
परंतु भोईर याची सोसायटीत प्रतिमा चांगली नसल्याच्या कारणावरून सोहन यांना ते आवडत नसे. यावरून त्यांनी त्याला समज देत त्याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार देखील केली होती. त्यानंतर इतरांनीही भोईरविरोधात तक्रार करून देखील स्थानिक पोलीस त्याला पाठीशी घालत होते, असाही सोसायटीमधील महिलांचा आरोप आहे. अखेर मंगळवारी सकाळी चौधरी व भोईर यांच्यात पुन्हा वाद झाला असता, भोईर याने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.