सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई : अपहरण करून आणलेल्या १० दिवसाच्या बालकाची विक्री होण्यापूर्वीच पोलिसांनी त्याची सुखरूप सुटका केली आहे. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून त्यात दोघा महिलांचा समावेश आहे. परंतु हे बालक त्यांनी कुठून आणले याचा अद्याप उलगडा झालेला नाही.
कोपर खैरणे रेल्वेस्थानकाबाहेर ठाणे बेलापूर मार्गावर नवजात बालकाच्या विक्रीचा व्यवहार होणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त तुषार दोषी, सहायक आयुक्त अजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शिरीष पवार, सहायक निरीक्षक विजय चव्हाण, उपनिरीक्षक योगेश वाघमारे, सहायक उपनिरीक्षक शेखर तायडे, मनोहर चव्हाण यांचे पथक तयार करण्यात आले होते. त्यांनी शुक्रवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास कोपर खैरणे स्थानकाबाहेर सापळा रचला होता. यावेळी एका नवजात बालकासह त्याठिकाणी आलेल्या चौघांची चौकशी करण्यात आली. चौकशीत त्यांच्यापासून समाधानकारक खुलासा न झाल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. यावेळी त्यांनी त्यांच्याकडील सुमारे १० ते १५ दिवसाच्या बालकाच्या विक्रीसाठी ते त्याठिकाणी आले होते याचीही त्यांनी कबुली दिली. माजीद अब्दुल माजिद शेख (२७), रईस हजरत काझी (२६), नगीना बेगम युसूफ खान (२८) व मंजुषा तिलक खाटोडा (२३) अशी त्यांची नावे आहेत. चौघेही मुंब्रा व मुंबई परिसरात राहणारे आहेत. तीन लाख रुपयांना त्यांच्याकडील बालक संबंधिताला विकणार होते. तत्पूर्वीच पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करून नवजात बालकाची सुखरूप सुटका केली. मात्र त्यांनी हे नवजात बालक कुठून अपहरण करून आणले याची माहिती अद्याप दिलेली नाही. त्याप्रकरणी खंडणी विरोधी पथक अधिक तपास करत आहेत.