लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : शुक्रवारी पहाटे अचानक कंटेनरसारखे अवजड वाहने बंद पडल्याने जिल्ह्यातून जाणाऱ्या सर्व महामार्गांवर वाहतूककोंडी झाली. त्यातच पेट्या व्हायरसमुळे जेएनपीटीतील कंटेनरची चढउतार विस्कटल्याने वाहतूककोंडीवर परिणाम झाल्याचे पोलिसांनी सांगितले. यामुळे लहान वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. याचा फटका शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील वाहतुकीवर झाला. दुपारनंतर हळूहळू वाहतूक सुरळीत झाल्याचा दावा ठाणे शहर वाहतूक शाखेने केला. सकाळी ८.३० पासून सुरू झालेली ही वाहतूककोंडी दिवसभर होती. वाहतूक विभागाकडूनदेखील कोणत्याही प्रकारच्या सूचना मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संताप होता. त्यातच रस्त्यांवरील खड्डे, मुंबई-नाशिक महामार्गावर तीन अवजड वाहने बंद पडल्यामुळे रांजणोली नाक्याकडून खारेगाव टोलनाक्याकडे येणारी वाहतूक मंदावली होती. त्याचबरोबर काल्हेर, कल्याण-भिवंडी, मुंब्रा, शीळफाट्यापर्यंत वाहतूकही मंदावली होती. मुंब्रा-शीळफाटा, काल्हेर-कशेळी-कल्याण, माजिवडानाका, माणकोलीनाका येथे अवजड वाहतुकीची कोंडी झाली होती. त्याचबरोबर मुंब्रा बायपास-शीळफाटा परिसरात पावसाने मोठे खड्डे पडल्याने आणि रेतीबंदर रस्त्यावर पाणी साचल्याने जुन्या मुंबई-पुणे हाय वे वरही मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाल्याने ठाण्याच्या चारही बाजूला वाहनांचा विळखा दिसत होता. त्यामुळे अनेक ठिकाणी सात ते आठ किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. तसेच जेएनपीटीच्या सॉफ्टवेअरमध्ये झालेल्या बिघाडामुळे ठाण्याच्या चारही बाजूंनी शुक्रवारी सकाळपासून वाहतूककोंडी झाली होती.
चारही बाजूंनी झाली ठाण्याची कोंडी
By admin | Published: July 01, 2017 7:35 AM