नवी मुंबई : बनावट नोटा बाळगणाऱ्या चौघांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून ३८ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. ते मूळचे पश्चिम बंगालचे असून, खरेदीच्या बहाण्याने बनावट नोटा चलनात आणत.कोपरखैरणे परिसरात बनावट नोटांचा वापर होत असल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन जगताप व त्यांच्या पथकाने ठिकठिकाणी सापळे रचले होते. या वेळी खरेदीच्या बहाण्याने दुकानात जाऊन १ हजार रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणारी चौघांची टोळी असल्याचे निदर्शनास आले. मुकुल शेख (२४), बोदरअली शेख (२०), रब्बुल शेख (२५) व मोहम्मद शेख (२८) अशी त्यांची नावे आहेत. हे सर्वजण कोपरखैरणे गावात भाड्याच्या घरात राहत होते. ते मूळचे पश्चिम बंगालचे आहेत. पोलिसांनी घेतलेल्या झडतीमध्ये त्यांच्याकडून १ हजार रुपयांच्या ३८ बनावट नोटा आढळल्या. त्या सर्व नोटा बनावट असल्याची खात्री बँकेतून केल्याचे पोलीस निरीक्षक राजन जगताप यांनी सांगितले. त्यानुसार या चौघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यापैकी रब्बुल व बोदरअली यांच्यावर यापूर्वीही बनावट नोटा वापरल्याप्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. १ हजार रुपयांची बनावट नोट चलनात आणण्यासाठी ते एखाद्या दुकानात जाऊन १०० ते १५० रुपयांची खरेदी करायचे. त्यानंतर दुकानदाराला हजार रुपयांची नोट देऊन ती चलनात आणायचे. ते भाड्याच्या घरात राहत होते, पण घरमालकाने त्यांच्यासोबत करार केला नव्हता. शिवाय कसलीही चौकशी न करता त्यांना घर भाड्याने दिले होते. त्यानुसार घरमालकावरही कारवाईची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
बनावट नोटांप्रकरणी चौघांना अटक
By admin | Published: June 29, 2015 4:54 AM