कर्जत : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे कर्जत तालुक्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ४०० हून अधिक कंपन्यांनी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या होत्या. तर ४ हजार तरुणांना या मेळाव्यात नोकरीची नेमणूकपत्रे देण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कर्जतमधील रॉयल गार्डनच्या सभागृहात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या नोकरी मेळाव्याचे उद्घाटन मनसेचे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
जितेंद्र पाटील म्हणाले, सुशिक्षित असूनही कोरोना च्या काळात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. त्यासाठी आम्ही रोजगार मेळावा आयोजित केला आहे. आम्ही रायगड जिल्ह्यातील कंपन्यांमध्ये नोकऱ्या देण्यासाठी पत्रक द्यायला जातो तेव्हा तेथील इतर पक्षांचे नेते मध्यस्थीसाठी येतात. त्यातही ही कंपनी आमच्या अखत्यारीत असल्याचे सांगतात. तसेच इथे लक्ष देऊ नका असे सांगतात. ही नोकऱ्यांची मोठी शोकांतिका आहे. परंतु नोकऱ्या आमच्या हक्काच्या आहेत. यापुढे कंपनी मालक किंवा प्रशासनाने स्थानिकांना नोकऱ्या दिल्या नाहीत तर पत्रक नसेल थेट उत्तर असेल, असा इशारा जितेंद्र पाटील यांनी दिला.
कर्जतला आणखी मेळावे घेणार असल्याचे आश्वासन मनसेचे नेते शिरीष सावंत यांनी दिले. कर्जतमध्ये अनेक हुशार तरुण मुले आहेत. त्यांना दिशा दाखविणे गरजेचे असून त्यासाठी नोकऱ्या देणे गरजेचे आहे. त्यामुळे यापुढे कर्जतसह जिल्ह्यात असेच आणखी मेळावे घेण्याची गरज असल्याचे शिरीष सावंत यांनी सांगितले. नितीन सरदेसाई यांनी मनोगतात म्हणाले, स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी आमच्या नेत्यांची असलेली दहशत योग्यच आहे. त्याचे आम्ही समर्थन करतो. तसेच, अनेक भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये डावलले जात आहे. त्यासाठी आपण यापूर्वी लढा दिला आहे आणि यापुढेही लढा देत राहू. एकही बेरोजगार राहणार नाही असे काम करणार असल्याचे सांगितले.
या कंपन्यांचा समावेशपेटीएम, फोन पे, भारत पे, आयसीआयसीआय, एक्सिस, कल्पवृक्ष, रिलायन्स ग्रुप, छेडा फाउंडेशन, टेक महिंद्रा, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, भारती एअरटेल, स्नॅपडील, टाटा स्काय, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइज, एचडीएफसी, कोटक महिंद्रा, अक्षय एज्युकेशन इन्स्टिट्यूट आदींसह जवळपास साठ कंपन्यांचे स्टॉल लावण्यात आले होते. या वेळी १,६२८ उमेदवारांनी अर्ज केले असून, ४ हजार जणांना नेमणूक पत्रे देण्यात आली.