- नामदेव मोरेनवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभर त्रिस्तरीय आरोग्य रचना करण्यात आली आहे. परंतु नवी मुंबई महापालिकेने यामध्ये फ्लू क्लिनिकची भर टाकून चारस्तरीय रचना तयार केली आहे. यामुळे कोरोनाव्यतिरिक्त ताप, सर्दी, खोकला असणाऱ्या रुग्णांची गैरसोय दूर होत आहे. फ्लू क्लिनिकचा २३,८४२ नागरिकांना लाभ झाला आहे. शहरात आतापर्यंत दहा हजारांहून अधिक नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत १६,८०० पेक्षा जास्त नागरिकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
नवी मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती व मुंबईत अत्यावश्यक सेवा देण्यासाठी जाणाºया कर्मचाऱ्यांमुळे शहरातील रुग्णसंख्या वाढली आहे. नवी मुंबईमधील प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नागरिकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालिका प्रशासन दिवसरात्र प्रयत्न करत आहे. १३ मार्चला पहिला रुग्ण सापडल्यापासून ते आतापर्यंत अनेक कर्मचाºयांनी साप्ताहिक सुट्टी घेतलेली नाही. आयुक्त अण्णासाहेब मिसाळ स्वत: सर्व उपाययोजनांवर लक्ष ठेवून आहेत.
शासनाने राज्यात सर्वत्र त्रिस्तरीय रचना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोविड रुग्णालयाचा समावेश आहे. सर्वसाधारण लक्षणे असणारे रुग्ण व होम क्वारंटाइन शक्य नसणाºयांना या केंद्रात ठेवले आहे. नवी मुंबईमध्ये चार ठिकाणी ही केंद्रे सुरू असून त्यामध्ये २०९२ खाटांची सोय करण्यात आली आहे.
ही क्षमता लवकरच २२४२ इतकी वाढविण्यात येणार आहे. मध्यम स्वरूपाची लक्षणे असणाºया कोरोना रुग्णांना कोविड हेल्थ सेंटरमध्ये ठेवले जात आहे. नवी मुंबईमध्ये अशा प्रकारची तीन सेंटर असून त्यामध्ये ५३५ खाटांची सुविधा केली आहे. ही क्षमता १०७५ पर्यंत वाढविण्यात येणार आहे.
कोरोनाची तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांना डेडिकेटेड रुग्णालयात ठेवण्यात येते. नवी मुंबईत तीन ठिकाणी ही सुविधा उपलब्ध असून ७७४ खाटांची क्षमता आहे. त्यामधील १६८ खाटांचा प्रत्यक्ष वापर सुरू आहे. भविष्यात अजून १५० खाटांची क्षमता वाढविण्यात येणार आहे.फ्लू क्लिनिक ठरतेय प्रभावी; ताप, सर्दी, खोकल्यावर उपचार शासनाने कोरोनाला रोखण्यासाठी त्रिस्तरीय रचना तयार केली असून त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना महापालिकांना दिल्या आहेत.
नवी मुंबईत फ्लू क्लिनिक सुरू करून चारस्तरीय रचना तयार केली आहे. नेरूळ, बेलापूर, ऐरोली व तुर्भे रुग्णालय व २३ नागरी आरोग्य केंद्रांत ही क्लिनिक सुरू केली आहेत. या ठिकाणी ताप, सर्दी, खोकला असणाºया रुग्णांवर उपचार केले जात आहेत.खासगी क्लिनिक बंद असल्यामुळे मनपाच्या फ्लू क्लिनिकचा शहरवासीयांना आधार असून आतापर्यंत तब्बल २३,८४२ नागरिकांनी लाभ घेतला आहे.