पनवेल : महापालिका क्षेत्रातील चार गावे स्मार्ट व्हिलेज करण्याचा निर्णय पनवेल महापालिकेने घेतला आहे. बुधवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने या संबंधीच्या ठरावाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी ६0 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आपल्या क्षेत्रातील गावे स्मार्ट करण्यासाठी धोरण ठरविणारी पनवेल ही एकमेव महापालिका ठरली आहे.
प्रस्तावित स्मार्ट व्हिलेजमध्ये रोडपाली, कोयनावेळे, करवले, धानसर या चार गावांचा समावेश आहे. स्थायी समितीचे माजी सभापती अरुण पाटील यांनी २0१७-२0१८ मध्ये हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडला होता. त्यानुसार स्मार्ट व्हिलेजसाठी एकूण ६0 कोटीची तरतूद मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. या कामासाठी एजन्सी नियुक्ती करून २९ गावांचा सर्व्हेही करण्यात आला. त्यानंतर पहिल्या टप्प्यात चार गावांचा समावेश या स्मार्ट व्हिलेज प्रकल्पात करण्यात आला. यासंबंधीचा ठराव बुधवारी सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी आणण्यात आला. त्याला बहुमताने मंजुरी देण्यात आली. या स्मार्ट व्हिलेजअंतर्गत गावातील पायाभूत सुविधांसह जलनि:सारण वाहिन्या, रस्त्यांचे काँक्रीटीकरण, विद्युत पुरवठा,पाणीपुरवठा आदी कामे सर्वप्रथम पूर्ण केली जाणार आहेत. विशेष म्हणजे या चार गावांमध्ये कोयना प्रकल्पामुळे विस्थापित झालेले कोयनावेळे गाव, सिडको नोडमध्ये असलेले रोडपाली गावासह करवले व धानसर गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. या चार गावांमध्ये वेगवेगळ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. धानसर गावासाठी १0 कोटी ६२ लाख, कोयनावेळे गावासाठी १५ कोटी २७ लाख, करवले गावासाठी १२ कोटी ४१ लाख, रोडपाली गावासाठी १२ कोटी ७३ लाख रु पयांचा निधी राखीव ठेवण्यात आलेला आहे. यानुसार लवकरच या कामांची निविदा प्रकाशित केली जाणार आहे. या व्यतिरिक्त महासभेत पालिका क्षेत्रातील मोकळ्या भूखंडांना तारेचे कुंपण घालणे, पार्किंगचे धोरण, पालिका क्षेत्रातील गावांमध्ये पावसाळी गटार बांधणे, याविषयांना मंजुरी देण्यात आली.महासभेत सुरु वातीला आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आयकरसंदर्भात जनजागृती करीत आयकरच्या नवीन योजना कामांच्या पद्धतीची माहिती देण्यात आली. नगरसेवकांनी देखील आयकर भरणा करण्यासंदर्भात जनजागृती करण्याचे आवाहन यावेळी उपस्थित आयकर अधिकाºयांनी केली. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विभागाच्या मार्फत राबविण्यात येण्यात असलेल्या योजनांची माहिती या अधिकाºयांनी नगरसेवकांना दिली. मात्र नगरसेवकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.महाराष्ट्र शासनाच्या भरपूर योजना राबविल्या जात असून देखील नगरसेवकांना कोणतीच माहिती का दिली नाही ? असा प्रश्न यावेळी उपस्थित केला. शेकाप नगरसेवक बबन मुकादम, सभागृह नेते परेश ठाकूर, लीना गरड,अरविंद म्हात्रे, संतोष शेट्टी या नगरसेवकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. महासभेदरम्यान पालिका विकसित करीत असलेल्या महात्मा गांधी उद्यानाच्या कामाचे सादरीकरण पॉवर पॉइंटद्वारे करण्यात आले. उद्यानात रहिवाशांच्या मनोरंजनासाठी कारंजे, एम्पी थिएटर आदींसह विविध कामांची माहिती याठिकाणी नगरसेवकांना देण्यात आली.स्मार्ट व्हिलेज संकल्पनेनुसार पनवेल महानगर पालिका पहिल्या टप्प्यात चार गावांचा विकास करणार आहे. टप्प्याटप्प्याने २९ गावे या धर्तीवर विकसित केली जाणार आहेत. शहरांच्या धर्तीवर गावे देखील विकसित करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.- गणेश देशमुख,आयुक्त, पनवेल महापालिकापनवेल महानगर पालिकेने पालिका क्षेत्राबाहेर शौचालय बांधले असल्याचा आरोप नगरसेवक नीलेश बाविस्कर यांनी यावेळी केला. गव्हाण हे क्षेत्र पालिकेत समाविष्ट नसताना याठिकाणच्या रहिवाशाला पनवेल महानगर पालिकेने शौचालय बांधून कसे काय दिले असा प्रश्न केला. यासह पालिकेत समाविष्ट २९ गावांच्या विकासाकडे पालिकेचे दुर्लक्ष असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.