सूर्यकांत वाघमारे। लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात पाच महिन्यांत हत्येच्या १४ घटना घडल्या आहेत. त्यापैकी महत्त्वाच्या गुन्ह्यांची उकल करण्यात अद्याप पोलिसांना यश आलेले नाही. वाढत्या हत्येच्या घटनांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मागील काही वर्षात नियंत्रणात आलेली नवी मुंबईतील गुन्हेगारी पुन्हा डोके वर काढू लागल्याचे दिसून येत आहे. घरफोडी, जबरी चोरी, लूट यासह हत्येचे गुन्हे देखील घडू लागले आहेत. गेल्या पाच महिन्यांत पोलीस आयुक्तालय क्षेत्रात हत्येच्या १४ घटना घडल्या आहेत. त्यापैकी परिमंडळ एकमध्ये दहा तर परिमंडळ दोनमध्ये चार घटना घडलेल्या आहेत. तर अवघ्या रबाळे पोलीस ठाणे हद्दीतच चार घटना घडल्या आहेत. आयुक्तालय क्षेत्रात २०१५ मध्ये ४९ तर गतवर्षी ४२ हत्या झालेल्या आहेत. काही प्रकरणात महिलांची हत्या झाली असून, पतीनेच हत्या करुन पळ काढल्याचेही प्रकार आहेत. तीन महिन्यांपूर्वी पनवेल येथे महिलेचे तुकडे करुन टाकण्यात आले होते. मात्र पोलिसांनी कौशल्यपूर्ण कसून तपास करुन महिलेच्या मारेकऱ्यांना अटक केलेली आहे. परंतु नेवाळी गाव येथे अज्ञात व्यक्तीची जाळून झालेल्या हत्येचे गूढ अद्यापही कायम असून मारेकरीही मोकाट आहेत. अशा इतरही अनेक हत्येच्या घटनांमधील आरोपींना अटक करण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. २०१५ मध्ये घडलेल्या हत्येच्या गुन्ह्यांपैकी तीन गुन्ह्यांची उकल झालेली नाही. मात्र २०१६ मध्ये घडलेल्या ४२ गुन्ह्यांपैकी ७ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीस अपयशी ठरल्याने अद्याप उकल न झालेल्या गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
पाच महिन्यांत चौदा हत्या
By admin | Published: May 15, 2017 12:48 AM