उरण : भारतासाठी पाकिस्तानपेक्षा चीन अधिक धोकादायक असल्याचे सांगतानाच, १४ हजार ५०० दुष्काळग्रस्त गावे भाजपा सरकारने दुष्काळमुक्त केली असल्याचा दावा राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उरण येथे केला. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण निधीतून उरण शहरात करण्यात येणाºया ५६ कोटी खर्चाच्या विकासकामे योजनेचा शुभारंभ शुक्रवारी त्यांच्या हस्ते झाला.उरण नगरपरिषदेच्या टाउन हॉल इमारतीचे अद्ययावत बांधकाम, शहरातील मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण, विमला तलाव आणि उद्यानाचे सुशोभीकरण आदी विकासकामांची योजना आखण्यात आली होती. यासाठी लागणारा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विभागामार्फत मंजूर केला आहे. माजी नगराध्यक्ष महेश बालदी यांच्या प्रयत्नानंतर, या कामांसाठी लागणारा ५६ कोटींचा निधी उरण शहराच्या कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने उपलब्ध करून दिला आहे. या विविध विकासकामांच्या योजनांचा शुभारंभ शुक्रवारी राज्याचे बंदरे, वैद्यकीय, माहिती, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्या वेळी चव्हाण यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. ‘जलयुक्त शिवार’ योजनेतून २७ हजार ५०० दुष्काळग्रस्त गावांपैकी १४ हजार ५०० गावे भाजपा सरकारने दुष्काळमुक्त केली असल्याचा दावाही त्यांनी केला.या वेळी एलिफंटा बेटावर वीज आणणार असून, त्याचे उद्घाटनही मुख्यमंत्री आणि आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्याचा मानस बालदी यांनी व्यक्त केला. करंजा बंदरासाठी १५० कोटी निधीपैकी जेएनपीटीच्या सागरमाला योजनेतून ७५ कोटी, तर शासनाकडून ७५ कोटी निधी मिळणार आहे. करंजा रो रो सेवा सुरू करायची असून, शहरातील अंडरग्राउंड केबल्ससाठी ४० कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्याचेही बालदी म्हणाले.>सेनेची कार्यक्रमाकडे पाठउरण नगरपरिषदेत भाजपाची सत्ता असली, तरी उनपमध्ये सेनेचे पाच नगरसेवक आहेत. सेनेच्या एकाही नगरसेवकांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले नव्हते. यामुळे नगरसेवकांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली असल्याची माहिती सेनेचे गटनेते गणेश शिंदे यांनी दिली. सर्वांना निमंत्रण देण्याचे काम प्रशासनाकडे सोपविण्यात आले होते. त्यांनी ते केले की नाही, हे तपासून पाहावे लागेल, अशी प्रतिक्रिया भाजपाचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक प्रवक्ते कौशिक शहा यांनी दिली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सेनेचे आ. मनोहर भोईर कार्यक्रमाला आले नाहीत.
चौदा हजार ५०० गावे झाली दुष्काळमुक्त, उरण शहराच्या ५६ कोटी खर्चाच्या कामांचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 5:52 AM