पनवेल : शिकारीला गेलेल्या तरुणाला बंदुकीची गोळी लागून रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाला होता. यातील चौथ्या आरोपीला तालुका पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला २० एप्रिलपर्यंत पोलीसकोठडी सुनावली आहे. वावंजे-मानपाडा येथील वैराज पाटील व लहू पाटील हे शिकारीसाठी ८ एप्रिल रोजी जंगलात गेले होते. या वेळी वैराज अन्यत्र शिकार पाहण्यासाठी गेला असताना लहू पाटील यास शिकार दिसली, त्याने गोळी झाडली. मात्र, ती गोळी वैराजच्या मांडीला लागली. अति रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती संबंधित पोलीस स्टेशन तसेच डॉक्टरांना देण्यात आली नाही. गावामध्ये वैराज पाटील याचा अपघात झाल्याचे खोटे सांगण्यात आले व त्याच्यावर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. वैराज याच्या पत्नीने पतीच्या मृत्यूची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तपासची चक्रे फिरवली. गोळी लागून झालेल्या मृत्यूची माहिती व अंत्यसंस्कार करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न या कलमाखाली पोलिसांनी यातील भीमराव कुंडलिक पाटील (६८), अंकुश भीमराव पाटील (३४), वासुदेव कुंडलिक पाटील (५८) यांना अटक केली, तर लहू पाटील फरार झाला होता. तालुका पोलिसांनी फरार असलेल्या लहू पाटील यालाही अटक केली आहे. आरोपींना २० एप्रिलपर्यंत पोलीसकोठडी सुनावण्यात आली आहे.
तरुणाच्या मृत्यूप्रकरणी चौथ्या आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 11:59 PM