नवी मुंबई : मुंबई व नवी मुंबईला जोडण्यासाठी वाशी खाडीत चौथा पूल बांधण्यात येणार आहे. या कामामुळे स्थानिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेने केली असून, मागण्या मान्य न केल्यास तीव्र लढा उभारण्याचा इशारा दिला.एमएसआरडीसीच्या वतीने चौथ्या खाडीपुलाचे काम करण्यात येणार आहे. कामाला मंजुरी देताना त्याचा स्थानिकांच्या रोजगारावर काय परिणाम होणार, याचा विचार केलेला नाही. या कामामुळे स्थापित होणाऱ्यांचे पुनर्वसन करण्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे वाशीसह नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांमध्ये असंताेष निर्माण झाला. याविषयी माहिती देण्यासाठी नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेने मंगळवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. संस्थेचे अध्यक्ष दशरथ भगत व निशांत भगत यांनी मच्छीमार हक्क चळवळ उभी करून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला. खाडीपुलाला आमचा विरोध नाही, परंतु पुलाचे काम सुरू करण्यापूर्वी यामुळे विस्थापित होणाऱ्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे.वाशी खाडीमध्ये मासेमारी करणारे, डोलवाले, फगवाले, तरती जाळे, बुडीची जाळे, असुवाले, निवठ्या पकडणारे, गळवाले, जाळीवाले, शिंपल्या, कालवाचे गोळे व खुबे गोळा करणारे, कांदळवनातील खेकडे पकडणारे या सर्वांवर उपासमारीची वेळ येणार आहे. याशिवाय मासेविक्री करणाऱ्यांच्या रोजगारावरही परिणाम होणार आहे. नियमाप्रमाणे प्रकल्प सुरू करण्यापूर्वी त्याचा परिणामाविषयी अहवाल तयार करणे आवश्यक होते, परंतु त्याकडे एमएसआरडीसीने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप भगत यांनी केला आहे. १५ दिवसांमध्ये एमएसआरडीसीने याविषयी ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.प्रकल्पग्रस्तांनी केलेल्या प्रमुख मागण्या मासेमारीसाठी समुद्रात १२ नॉटिकलच्या पुढे मासेमारी करता यावी यासाठी बोटी, जाळी व इतर सुविधा द्याव्यात पुलाच्या कामामध्ये प्रकल्पग्रस्तांना ५० टक्के विविध कामांचे ठेेके देण्यात यावेत. प्रकल्पात स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. प्रकल्पबाधितांना एपीएमसीच्या धर्तीवर मार्केट बांधून द्यावे. मच्छी विक्रेते व मच्छीमार यांना छोट्या शीतपेट्या द्याव्यात. वाशीमधील बाधित होणाऱ्या दशक्रिया घाटाच्या जागेवर नवीन घाट बांधून देणे. वाशी गाव मच्छीमार बांधवांना पुलाकडे जेट्टीकडे जाण्यासाठी सर्व्हिस रोड बांधणे. वाशी गावालगत महामार्गाला मंजूर सर्व्हिस रस्ता त्वरित चालू करणे. विस्थापित होणारांचे पुनर्वसन करावे.चौथ्या खाडीपुलाला आमचा विरोध नाही. परंतु पुलामुळे विस्थापित होणारांचे पुनर्वसन करण्यात यावे. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवावेत. १५ दिवसांत मागण्या मान्य केल्या नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.- दशरथ भगत, अध्यक्ष, नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था
चौथ्या खाडीपुलाचा स्थानिक मच्छीमारांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 1:33 AM