नवी मुंबई : शिवसेनेच्यावतीने प्रत्येक वर्षी शहरातील अनाथाश्रम व वृद्धाश्रमामध्ये जावून दिवाळी सण साजरा करण्यात येतो. महिला आघाडीच्यावतीने यावर्षीही सानपाडा, नेरूळ व कोपरखैरणेमधील आश्रमांमध्ये जावून दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.महिला आघाडीच्या प्रमुख रंजना शिंत्रे यांच्यावतीने प्रत्येक वर्षी हा उपक्रम राबविला जात आहे. नेरूळमधील मातृसदर वृद्धाश्रम,सानपाडामधील वात्सल्य ट्रस्टमधील अनाथ मुले व वृद्ध, कोपरखैरणेमधील अनाथाश्रमांमध्ये जावून दिवाळी साजरी केली जाते. अनाथ मुलांनाही दिवाळीचा आनंद साजरा करता यावा, त्यांनाही आपल्या घरी नातेवाईक आल्याचा आनंद मिळावा यासाठी हा उपक्रम राबविला जातो. वृद्ध व मुलांशी संवाद साधून दिवस त्यांच्यासोबत घालविला जातो. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात नगरसेविका मेघाली राऊत, ऋचा पाटील, शशिकला पराजुली, आरती शिंदे, अलका राजे, शीतल कचरे, विनोदिनी आयरे, विद्या पावगे, उषा रेणके, मधू हरमळकर व इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)
अनाथ आश्रमात फराळाचे वाटप
By admin | Published: November 12, 2015 1:33 AM