नवी मुंबई : वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश देण्याचे आमिष दाखवून १९ विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. तब्बल ५७ लाख ५० हजार रुपये घेऊन एस्पाय इंडिया कंपनीचे तीन संचालक फरार झाले असून, त्यांच्याविरोधात एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये मनीष रावत, विवेक तिवारी, विवेक कौशिक यांचा समावेश आहे. तिघांनी एस्पाय इंडिया नावाची कंपनी सुरू केली होती. मुंबई एपीएमसी परिसरात एम्बीयन कोर्ट इमारतीमध्ये कार्यालय सुरू केले होते. राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश देत असल्याचे त्यांनी भासविले होते. बोरिवलीमध्ये राहणारे जामील खान यांच्या मुलीला एमबीबीएससाठी प्रवेश घ्यायचा होता. त्यांनी वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांची माहिती घेण्यास सुरुवात केली होती.
एक दिवस त्यांना एस्पाय स्टडी इंडियाच्या कार्यालयामधून फोन आला. नेहा नावाच्या महिलेने आमची कंपनी नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे काम करीत असून प्रवेश हवा असल्यास प्रत्यक्ष भेटण्यास सांगितले. २६ आॅगस्टला जामील यांनी कार्यालयात जाऊन माहिती घेतली असता त्यांना एमबीबीएसच्या साडेचार वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी प्रत्येक वर्षी दहा लाख रुपये फी द्यावी लागेल. सुरुवातीला तीन लाख रुपये एस्पाय इंडियाला धनादेशाद्वारे द्यायचे. वैद्यकीय प्रवेशाच्या वेळी पाच लाख ६५ हजार रुपये महाविद्यालयाला धनादेशाद्वारे द्यावे लागतील, असे सांगितले. प्रवेश मिळाल्यानंतर पुन्हा एक लाख ३५ हजार रुपये एस्पाय इंडियाला द्यावे लागतील, असे साांगितले होते.
प्रवेश मिळविण्यासाठी जामील व त्यांच्याप्रमाणेच इतर १९ जणांनी कंपनीच्या नावाने जवळपास तीन लाख रुपयांचा धनादेश दिला होता. यानंतर त्यांना जळगावमधील उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवून देण्याचे स्पष्ट केले होते. ९ आॅक्टोबरला जळगावमध्ये महाविद्यालयामध्ये भेटण्यास सांगितले होते; परंतु ७ आॅक्टोबरलाच कंपनीचे संचालक मनीष रावत, विवेक तिवारी व विवेक कौशिक यांचे फोन बंद असल्याचे निदर्शनास आले. कंपनीच्या कार्यालयामध्येही कोणीच आढळून आले नाही.
४ लाख ३५ हजार दलाली
एस्पाय स्टडी इंडियाच्या संचालकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून चार लाख ३५ हजार रुपये मागितली होती. त्यापैकी तीन लाख प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी व एक लाख ३५ हजार रुपये देण्याची मागणी केली होती. फसवणूक झालेल्यांच्या पालकांनी जळगावमध्ये महाविद्यालयाशी संपर्क साधला; परंतु संबंधित एजन्सीचा आमचा काहीही संबंध नसल्याचे महाविद्यालयाने स्पष्ट केले.