नवीन पनवेल : दोन कोटी रुपयांचे तीन कोटी रुपये करून देतो, असे सांगून फसवणूक केल्याचा प्रकार पनवेल येथे उघडकीस आला आहे. मयूर पांडुरंग गवळी यांनी याप्रकरणी दहा ते अकरा जणांविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मयूर गवळी यांचा पिंपरी-चिंचवड येथे अंडी विकण्याचा व्यवसाय आहे. त्यांना त्यांचा मित्र प्रशांत मोरे याने सुरतला राहणारे राजूभाई व आश्रफ यांनी गुजरात राज्यात निवडणुकीकरता जुन्या चलनी नोटांची गरज असल्याचे सांगितले. व त्या बदल्यात ते नवीन नोटा देत असल्याचे सांगितले. त्याने स्वतःकडील वीस लाख दिले असता त्याला ३० लाख मिळाले. त्यामुळे मयूर यांना राजूभाई व आश्रफ यांचा जवळचा व्यक्ती सुरेश कदम यांची भेट घालून दिली. आठ दिवसांनी मयूर, प्रशांत, सुरेश कदम व अक्षय कदम हे पिंपरी-चिंचवड येथे भेटले. यावेळी प्रशांत व सुरेश यांनी चार लाख नोटा सिरियलप्रमाणे दिल्या. बँकेत तपासले असता खरे असल्याचे समजले. त्यामुळे चार लाख रुपये मयूर यांनी परत केले. त्यानंतर आठ दिवसांनी कमीत कमी दोन कोटी रुपये असेल तरच व्यवहार होईल असे प्रशांत व सुरेश यांनी सांगितले. त्यामुळे मयूर यांनी दोन कोटी जमा केले. यावेळी दोन कोटींच्या बदल्यात तीन कोटी घेऊन देतो असे प्रशांत याने सांगितले.२६ एप्रिल रोजी प्रशांत यांच्या सोबत असलेल्या व्यक्तीकडे दोन कोटी दिले. त्यानंतर ती व्यक्ती रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या कारजवळ गेली व डिकी उघडून पैसे ठेवले. त्यातून पोलिसांसारखे असणारे चार ते पाच अनोळखी व्यक्ती उतरल्या व ते कारमध्ये बसले. त्यानंतर प्रशांत यांनी पोलिसांनी पैसे पकडले असल्याचे सांगितले व लोणावळ्यात जाऊन थांबा पैसे परत मिळतील असे सांगितले. मयूर हे लोणावळ्यात बराच वेळ थांबले. यावेळी त्यांना दोन दिवसात पैसे परत करणार असल्याचे मोरे यांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी सुरेश यांचा मुलगा अक्षय कदम याने दहा लाख रुपये मयूर यांना परत केले. व पुढील रक्कमेकरिता पैशांची मागणी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली.
दाेन काेटींचे ३ काेटी रुपये करून देताे; पनवेलमध्ये आमिष दाखवून फसवणूक; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2022 12:30 PM