नवी मुंबई : क्रिप्टो करंन्सीच्या माध्यमातून इतरांप्रमाणे आपण देखील नफा कमवायचा प्रयत्नात तरुणाने ४३ लाख रुपये गमावले आहेत. नफ्याची रक्कम खात्यात जमा होत नसल्याचे निदर्शनात आल्यानंतर त्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खारघर परिसरात राहणाऱ्या तरुणासोबत हा प्रकार घडला आहे. त्याला सोशल मीडियावर क्रिप्टो करन्सीमार्फत होणाऱ्या नफ्याची माहिती मिळाली होती. त्या लिंकला त्याने प्रतिसाद दिला असता त्याला व्हाट्सअप ग्रुपमध्ये घेण्यात आले होते. त्याठिकाणी इतर सभासदांकडून नफ्याचे पडणारे स्क्रिनशॉट पाहून आपणही नफा मिळवू शकतो असे त्याला वाटले होते.
यामुळे मागील एक महिन्यात त्याने टप्प्या टप्प्यात ४३ लाख ३८ हजार रुपये संबंधितांच्या सांगण्याप्रमाणे वेगवेगळ्या बँक खात्यावर पाठवले होते. त्यामधील ३८ लाख ८८ हजार स्वतःच्या खात्यातून तर ६ लाख ५० हजार पत्नीच्या खात्यातून भरले होते. मात्र एवढी रक्कम भरूनही नफ्याची दाखवली जाणारी रक्कम खात्यात जमा होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. याप्रकरणी त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली असता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.